CBI Raid In Bihar : फ्लोर टेस्टपूर्वी RJD च्या दोन नेत्यांवर CBI ची छापेमारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Politics

CBI Raid In Bihar : फ्लोर टेस्टपूर्वी RJD नेत्यांवर CBI ची छापेमारी

CBI Raid In Bihar RJD Leader Sunil Singh : बहुमत चाचणीपूर्वी बिहारमधून मोठी बातमी समोर आली असून, पाटणा येथील आरजेडीचे माजी आमदार सुबोध रॉय, आरजेडी नेते सुनील सिंग, अशफाक करीम आणि फैय्याज अहमद यांच्या घरांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. नोकरी घोटाळ्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सुनील सिंह हे सहकारी संस्थेशी संबंधित आहेत तसेच ते RJD चे खजिनदार देखील आहेत. राजदच्या नेत्यांवरील कारवाईवर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, काही सापडले तरच सीबीआय जाते असे भाजप नेते रामेश्वर चौरसिया यांनी म्हटले आहे.

नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप
हे प्रकरण 2004-2009 च्या रेल्वे भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन देण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे घेण्यात धोका असल्याने नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्यात आली. त्याचवेळी असे बेकायदेशीर काम करण्याची जबाबदारी लालूंचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांच्यावर देण्यात आली होती.

झारखंडमध्ये सीबीआयची कारवाई
बिहारशिवाय झारखंडमध्येही सीबीआयची कारवाई सुरू आहे. बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणी प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर केंद्रीय एजन्सीने येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने ज्या ठिकाणी छापे टाकले ते प्रेम प्रकाश नावाच्या व्यक्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. प्रेम प्रकाश यांचे राजकारण्यांशी घट्ट नाते असल्याचे बोलले जाते.

नितीश सरकारची आज विधानसभेत फ्लोर टेस्ट

सीबीआयची ही कारवाई बिहार विधानसभेतील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या आधी घडली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, त्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरही मतदान होणार आहे.

कारवाईवर लालूंच्या मुलीची प्रतिक्रिया

दरम्यान, सुनील सिंह यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याबाबत लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहिणी यांनी भाजपला बलात्कारी पक्ष म्हटले आहे. तसेच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी, ‘फ्लोअर टेस्टच्या आधीच ही रेपिस्ट पार्टी खालच्या स्तरावर आली असून, घाबरवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Web Title: Raids By Central Agency Are Underway At The Residence Of Rjd Mlc Sunil Singh In Patna Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..