अर्णव अटक प्रकरण : 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; अमित शहांनी केली आणीबाणीशी तुलना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचं नाव लिहलं होतं. 

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर भाजपने आता आक्षेप घेत टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. तसेच आमदार आशिष शेलार यांनी देखील टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन या कारवाईवर टीका केली आहे. 

हेही वाचा - एक थी शेरनी...संजय राऊत यांच्या ट्विटला कंगनाचं उत्तर

अमित शहा यांनी म्हटलंय की,  काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीसाठी लज्जास्पद असं कृत्य केलं आहे. रिपब्लिक टिव्ही आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधातील सत्तेचा वापर हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्यावरचा आणि लोकाशाहीच्या चौथ्या खांबावरचा हल्ला आहे. आणीबाणीची आठवण करुन देणाऱ्या या हल्ल्याचा स्वतंत्र माध्यमांसाठी निषेध करायलाच हवा आणि केला जाईलच. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन या घटनेला आणीबाणीशी जोडलं आहे. ते म्हणालेत की, आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.

काय आहे प्रकरण?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत होतं. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णव गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अर्णब विरुद्ध महाराष्ट्र सरकार संघर्ष 
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपासाचे प्रकरण मुंबई पोलिसांनी नीट हाताळले नसल्यावरुन अर्णव यांनी मुंबई पोलिसांवर यथेच्छ तोंडसुख घेतले होते. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अरेतुरेची भाषा वापरुन थेट आव्हानच दिलं होतं. त्यांच्या या अशा वर्तनावर शिक्षा व्हायला हवी म्हणून अर्णब यांच्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव देखील आणला गेला आहे. तरीही अर्णव यांनी मागे न हटता आपला एकूण वर्तवणूकीचा थाट तसाच ठेवला होता. त्यांच्या पत्रकारीतेवर सातत्याने टीका होते.

ते जी करतात ती पत्रकारीता नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे पत्रकारीतेची बदनामी होते असेही अनेकांचे मत आहे. त्यांच्या एका पत्रकाराला वार्तांकन करत असताना मुंबईतील इतर पत्रकारांनी मारहाण केली होती. वार्तांकनाची सनसनाटी पद्धत इतरांना त्रासदायक ठरत असल्याने त्यांना चोप बसला होता. अर्णव यांच्या आणि त्यांच्या चॅनेलच्या पत्रकारीतेला विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष सातत्याने समर्थन देतो असंही बोललं जातं, आणि म्हणूनच अर्णब यांची वागणूक कायम असल्याची चर्चा सातत्याने होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad police arrests republic tv editor in chief arnab goswami bjp attacked maharashtra government