व्हायरल पत्र खोटं पण प्रकृतीबद्दलची माहिती खरी; रजनीकांत यांचा राजकारण प्रवेशाबाबत खुलासा

वॉल्टर स्कॉट
Thursday, 29 October 2020

ज्याच्या राजकीय पदार्पणाची सगळ्या देशाला उत्सुकता लागली आहे तो दक्षिणेचा महानायक रजनीकांत आता आपला इरादा बदलण्याच्या विचारात आहे. याला कारण ठरले आहे रजनीकांत यांची प्रकृती.

चेन्नई -  ज्याच्या राजकीय पदार्पणाची सगळ्या देशाला उत्सुकता लागली आहे तो दक्षिणेचा महानायक रजनीकांत आता आपला इरादा बदलण्याच्या विचारात आहे. याला कारण ठरले आहे रजनीकांत यांची प्रकृती. डॉक्टरांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजनीकांत यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने ते तमिळनाडूतील विधानसभेच्या आगामी निवडणुकीपासून दूरच राहण्याची शक्यता आहे.

रजनीकांत यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना याअनुषंगाने पत्र लिहिले असून ते सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आहे. या पत्रामध्ये रजनीकांत यांनी आपण राजकारणामध्ये पदार्पण करण्यासाठी अद्याप तयार नसल्याचे म्हटले आहे. सध्या वाढलेला कोरोनाचा संसर्ग आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे रजनीकांत कोणतीही जोखीम घेणे टाळत आहेत.

रजनीकांत यांच्या मूत्रपिंडावर २०१६ मध्येच अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कोरोनाच्या काळामध्ये रजनीकांत यांना दगदग मानवणारी नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. खुद्द रजनीकांत देखील याला राजी झाल्याचे समजते. मला स्वतःची भीती वाटत नाही पण चाहते आणि लोकांमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे वाचा - पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO

पक्षामुळे कामाचा व्याप वाढणार
रजनीकांत यांनी पक्ष स्थापन केल्यास त्यांना राज्यभर दौरे करावे लागतील याशिवाय राजकीय घडामोडींमध्येही सक्रिय राहावे लागेल. याचा आपल्या प्रकृतीवर देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती रजनीकांत यांनी बोलून दाखविली आहे. लोकांचा निर्णय हा देवाचा निर्णय असल्याने सगळी स्थिती पूर्ववत झाल्यानंतर आपण निर्णय जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.

‘ते’ पत्र आपले नाही
रजनीकांत यांनी मात्र सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेले ते पत्र आपले नसल्याचा दावा केला आहे. डॉक्टरांनी आपल्याला दिलेला विश्रांतीचा सल्ला खरा असल्याने तूर्त आपण थांबण्याचा निर्णय घेत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. खुद्द रजनीकांत यांनीच आज ट्विटरवरून याची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajanikanth says leaked-letter-not-mine-but-info-on-health-true