शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे बर्ड फ्लू पसरवण्याचा कट; भाजपचा आमदार बरळला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

गेल्या दिड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा भागातले शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मदन दिलावर यांनी म्हटलंय की, काही तथाकथित शेतकरी आंदोलन करत आहेत. हे तथाकथित शेतकरी कोणत्याही आंदोलनात भाग घेत नाहीयेत तर मोकळ्या वेळेत चिकन बिर्याणी आणि ड्राय फ्रूट्सचा आनंद घेतायत. हे तर बर्ड फ्लू पसरवण्याचे मोठे कारस्थान आहे.  दिलावर यांनी पुढे म्हटलं की शेतकऱ्यांच्या दरम्यान दहशतवादी, दरोडेखोर आणि चोर असू शकतात. तसेच ते शेतकऱ्यांचे शत्रू देखिल असू शकतात. हे सगळे लोक देशाला उद्ध्वस्त करु इच्छित आहेत. जर सरकारने त्यांना आंदोलन स्थळावरुन हटवलं नाही तर बर्ड फ्लूची एक मोठी समस्या उभी राहू शकते. 

हेही पहा - कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका? 

 
गेल्या दिड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा भागातले शेतकरी आंदोलन करत आहेत. सुधारित कृषी कायदे रद्दच केले जावेत, अशी मागणी करत हे शेतकरी ऐन कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. या दरम्यानच मदन दिलावर यांचं हे वक्तव्य राजकारण तापवणारे ठरले आहे. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चहुबाजूंनी टीकेस पात्र ठरले आहे. 

शेतकरी नेत्यांनी कडक शब्दांत केली टीका
भाजपचे प्रदेश महामंत्री मदन दिलावर यांच्या या वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. अखिल भारतीय किसान महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष दुलीचंद बोरदा यांनी मदन दिलावर यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 

बोरदा यांनी म्हटलं की, मदन दिलावर आणि भाजपचे नेते शेतकरी आंदोलनाच्या सुरवातीपासूनच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे काहीही फरक पडणार नाहीये. शेतकरी तेंव्हाच मागे हटतील जेंव्हा त्यांच्या मागण्या पूर्ण होतील. बोरदा यांनी मदन दिलावर यांच्यावर आरोप लावत म्हटलं की, आपला गमावलेला जनाधार मिळवण्यासाठी ते याप्रकारची वक्तव्ये करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan BJP MLA Madan Dilawar says farmers protest is a conspiracy to spread bird flu