Sachin Pilot : सचिन पायलट गद्दार! ; अशोक गेहलोत यांची बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot criticism on Congress leader Sachin Pilot

Sachin Pilot : सचिन पायलट गद्दार! ; अशोक गेहलोत यांची बोचरी टीका

नवी दिल्ली : ‘काँग्रेस नेते सचिन पायलट हे गद्दार आहेत’ अशा शब्दांत, गुरुवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका केली आहे. ‘‘पायलट यांनी २०२०मध्ये पक्षाविरोधात बंड केले होते आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ते आपली जागा कधीच घेऊ शकणार नाहीत’’ असेही गेहलोत म्हणाले. दरम्यान, पायलट यांनी गेहलोत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

गेहलोत यांनी यावेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर देखील टीका केली. गेहलोत यांच्या बंडाला अमित शहा यांची फूस होती असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, पायलट यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गुरुग्राम येथील रिसोर्टध्ये भेटले होते. तसेच त्यांनी प्रत्येक आमदाराला दहा कोटी रुपये दिले असून आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. गेहलोत म्हणाले की, असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळेल की, एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानेच स्वतःच्या पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असेल. या कृत्याबद्दल पायलट यांनी माफी मागायला हवी होती.

दरम्यान, आज मध्य प्रदेशात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या सचिन पायलट यांनी गेहलोत यांचे वक्तव्य नाकारले.

भाजपने आरोप फेटाळले

राजस्थानचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे.भाजपने कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराला पैसे दिले नसल्याचे पुनिया यांनी सांगितले.