''लव्ह जिहादच्या शब्दांतून भाजप रचतोय देश तोडण्याचा डाव"

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

देशात फूट पाडण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द नष्ट करण्यासाठी 'लव्ह जिहाद' ही संकल्पना भाजपाद्वारे तयार केली गेली आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.

जयपूर : गेल्या काही दिवसांपासून देशा 'लव्ह जिहाद' बाबत सातत्याने चर्चा  होताना दिसतेय. मध्यप्रदेश पाठोपाठ आता उत्तर प्रदेश सरकारनेही लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कडक कायदा करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरु केल्या आहेत. यावर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटंलय की देशात फूट पाडण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द नष्ट करण्यासाठी 'लव्ह जिहाद' हा शब्द आणि ही संकल्पना भाजपाद्वारे तयार केली गेली आहे. 

हेही वाचा - Corona Virus : अहमदाबादमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; शाळा सुरु करण्याचाही निर्णय देखील रद्द

भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांत एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने लव्ह जिहादविरोधात कडक कायदा करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याआधी मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मध्यप्रदेश फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट-2020 या नावाचा कायदा आणला जात आहे. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशात हा कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

यावर आता काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, देशात फूट पाडण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द नष्ट करण्यासाठी 'लव्ह जिहाद' हा शब्द आणि ही संकल्पना भाजपाद्वारे तयार केली गेली आहे. लग्न ही प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची बाब आहे. अशाप्रकारे कायदे करुन त्यावर बंधन आणणे हे  पूर्णत: असंवैधानिक आहे तसेच हा कायदा कोणत्याच न्यायलयात टिकणार नसल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

पुढे त्यांनी म्हटलंय की, भाजप देशात असे वातावरण तयार करत आहे जिथे प्रौढ व्यक्तींना लग्नासाठी संमती ही सत्तेच्या दयेवर अवलंबून असेल. विवाह हा एक वैयक्तिक निर्णय आहे आणि ते यावर अंकुश लावू  पाहत आहेत. हे सरळ-सरळ वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे आहे. सामाजिक सौहार्दाला नख लावणे आणि समाजातील तेढ वाढवण्याचेच हे काम आहे. कोणत्याही पायावर नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही या संवैधानिक तरतुदीचा अवमान करण्यासारखे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan CM Ashok Gehlot accused bjp for dividing the nation in the name of love jihad