esakal | राजस्थानातही काँग्रेस सरकार धोक्यात; सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot

काँग्रेसच्या 30 आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा सचिन पायलट यांना पाठिंबा असल्यानं अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वाखालील सरकार अल्पमतात जाण्याचा धोका आहे.

राजस्थानातही काँग्रेस सरकार धोक्यात; सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात सापडलं आहे. घोडेबाजार होत असल्याच्या प्रकरणी एसओजीकडून चौकशीसाठी बोलावल्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट त्यांच्या काही आमदारांसह दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की, सोमवारी होणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला सचिन पायलट उपस्थित राहणार नाहीत. तसंच काँग्रेसच्या 30 आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा सचिन पायलट यांना पाठिंबा असल्यानं अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वाखालील सरकार अल्पमतात जाण्याचा धोका आहे. सचिन पायलट यांचा जो काही निर्णय़ असेल तो मान्य असेल असंही या आमदारांनी म्हटलं आहे. पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयश आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशानंतर राजस्थानातही काँग्रेसचं सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसला राम राम करून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांची सचिन पायलट यांनी भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. सिंधिया यांनी याआधी पायलट यांच्याबाबत ट्विटही केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझा सहकारी सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे दुखी आहे. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमता असलेल्यांना किती कमी जागा आहे हे यावरून दिसतं.

सचिन पायलट यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता असंही समजतं. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सर्व आमदारांना जयपूरला एकत्र बोलावलं आहे. मात्र सचिन पायलट यांच्यासोबत असेलले आमदार गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला पोहोचण्याची शक्यता कमी आहे. 

हे वाचा - हार्दिक पटेल यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; 'या' पदावर केली नियुक्ती

पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस पाठवली होती. राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या आरोपांवरून त्यांची चौकशी होणार होती. एसओजीकडून चौकशीबाबत नोटीस मिळताच आपलेच सरकार आपल्याकडे संशयाने बघत असल्यानं पायलट नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पायलट शनिवारी 12 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांसह दिल्लीला पोहोचले होते. दरम्यान, एसओजीने या प्रकरणात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही नोटीस पाठवली होती.