ग्रामीण महिला बनल्या ‘कॉम्प्युटर सखी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Computer Training

ग्रामीण महिला बनल्या ‘कॉम्प्युटर सखी’

जयपूर : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांतील महिला आता संगणकाचे प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा प्रशासनाने ‘कॉम्प्युटर सखी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून ७० हजार महिलांना संगणकाचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना ग्रामपंचायतींमध्ये तातडीने नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकारने त्यांना तत्काळ प्रमाणपत्र द्यावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

याआधी स्थानिक शाळांमधील लॅबमध्ये साडेसहा हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून नवी बॅच ही पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. या जिल्ह्यामध्ये विविध बचत गटांशी संबंधित तब्बल ७० हजार महिला आहेत. या सगळ्या महिलांना डिजिटली आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या लॅबचाच आधार घेण्यात आला होता, असे चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ सिहाग यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.

सगळ्याच शाळांत संगणक पोचणार

चुरू जिल्ह्यामध्ये ५३२ शाळा असून जवळपास सगळ्याच शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब आणि शिक्षकही आहेत. त्यांचाच वापर प्रशिक्षणासाठी केला जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सगळ्याच शाळांमध्ये कॉम्युटर लॅब असतील या सगळ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील असेल. ज्या महिला बचत गटांमध्ये सहभागी आहेत त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यताही देण्यात आली आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम

  • १००० महिलांना प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण

  • १५ दिवस प्रशिक्षण कालावधी

  • २५ ते ३० हजार महिलांना सहा महिन्यांत प्रशिक्षण देणार

माझा मुलगा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकत होता पण मला मात्र संगणकाची फारशी माहिती नव्हती.या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मला बेसिक सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता नोकरीसाठी मला आणखी चांगले प्रशिक्षण घ्यायचे आहे यासाठी प्रमाणपत्र आणि मार्गदर्शन खूप मोलाचे ठरणार आहे.

- दौलत कंवर, ‘बिडसादर’च्या रहिवासी

Web Title: Rajasthan Rural Women Computer Training Job Gram Panchayat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..