हळदीच्या अंगाने थेट युद्धभूमीवर...

हळदीच्या अंगाने थेट युद्धभूमीवर...

चिक्कोडी - युद्धजन्य परिस्थिती असते... सैन्यात जवान असलेला नायक लग्नासाठी गावी आलेला असतो... लग्न होते अन्‌ त्याला तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश येतात... तो जड अंत:करणाने निघतो... हा मन हेलावणारा प्रसंग आपण बॉर्डर चित्रपटात पाहिलेला आहे... पण हे चित्र वास्तवात उतरले आहे मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे. होय, येथील जवानाला लग्नानंतर चौथ्या दिवशी युद्धभूमीवर रुजू होण्याचा आदेश आला अन्‌ तो हळदीच्या अंगाने देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत रवानाही झाला.

राजेंद्र श्रीकांत सुतार असे त्या जवानाचे नाव आहे. मलिकवाड (ता. चिक्कोडी) गावाला सैनिकी परंपरा आहे. येथील सैनिकांनी पाकिस्तान, चीनसह विविध युद्धांत लक्षणीय कामगिरी बजावली आहे. सीमेवर युद्धजन्य स्थिती असल्याने भारतीय वायुदलात असलेल्या व विवाहासाठी रजेवर आलेल्या राजेंद्र सुतार यांना लग्नातील हळदीच्या अंगानेच माघारी सेवेत बोलावण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही संकटकाळात देशसेवा महत्त्वाची असल्याचे समजून त्याला पुन्हा देशसेवेत धाडण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली आई आपल्याला केवळ ९ महिने ९ दिवस पोटात सांभाळते; पण जन्मापासून अखेरच्या श्‍वासापर्यंत आपला सांभाळ करणाऱ्या मातृभूमीचे ऋण त्याहून मोठे आहेत. तिचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. गावातील आजी, माजी सैनिक व मोजक्‍या सैन्यासह शत्रूला जेरीस आणणारे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असून, देशसेवेसाठी मी पुन्हा जात आहे.
- राजेंद्र सुतार
, जवान

मलिकवाडमधील सैनिकांनी विविध युद्धांत शौर्य गाजविले आहे. राजेंद्रचे वडील श्रीकांत सुतार सैन्यदलात होते. त्यांच्या निवृत्तीनंतर राजेंद्र सुतार यांची भारतीय हवाई दलात नियुक्ती झाली. एअरमन म्हणून ते कार्पोरल रॅंकमध्ये कार्यरत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच ते विवाहासाठी महिन्याभराच्या सुटीवर आले होते. रविवारी (ता. २४) त्यांचा काडापूर येथील माधुरी यांच्याशी विवाह झाला. याचदरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानबरोबर युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने राजेंद्र यांना तातडीने सेवेत हजर होण्याचे आदेश सैन्य दलाकडून आले. 

लग्नाच्या हळदीचे पाणीही पूर्ण होण्यापूर्वी त्यांना पुन्हा देशसेवेसाठी हवाई दलात हजर व्हावे लागले. वडील श्रीकांत, आई सुनीता, पत्नी माधुरी यांनीही राजेंद्र यांना पाठबळ देत लग्नाच्या हौसेला मुरड घालत देशसेवेत हजर होण्यासाठी प्रोत्साहन दिले. लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशीच राजेंद्र यांना सीमेवर हजर व्हावे लागत आहे. सुटी अद्याप १५ दिवस शिल्लक असूनही बोलावणे आल्याने ते गुरूवारी (ता. २८) रवाना झाले असून विमानाने शुक्रवारी (ता. १) आपल्या युनिटमध्ये हजर होणार आहेत. त्यांच्यासोबत याच गावातील अन्य एक जवान रोहित वडगावे यांनाही सुटीवरून तातडीने सैन्यात हजर होण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानेही तत्काळ देशसेवेसाठी प्रयाण केले आहे. एकाचवेळी गावातील दोन जवानांना देशसेवेसाठी तत्काळ बोलावणे आल्याने गावातील लोकांचाही अभिमान भरून आलेला पाहायला मिळाला.

माझे पती श्रीकांत सुतार यांनी २८ वर्षे सैन्यदलात सेवा केली आहे. त्यामुळे देशसेवा किती महत्त्वाची आहे याची जाणीव आहे. मुलग्याचे नुकतेच लग्न झाले असले तरी कुटुंबापेक्षा त्याची देशाला अधिक गरज असल्याने त्याला पुन्हा सेवेत पाठवत आहे.
- सुनीता सुतार,
जवान राजेंद्रची आई

राजेंद्र सुतार सतत कुटुंबातील कार्यक्रमात सामाजिक उपक्रम राबवितात. त्यांच्या बहिणीच्या विवाहाप्रसंगी त्यांनी अनाथ आश्रमातील मुलांना लग्नकार्यात निमंत्रण देऊन त्यांना आपुलकी दिली होती. त्यांचा रविवारी (ता. २४) विवाह झाला. त्यांच्या लग्नपत्रिकेतही त्यांनी वृक्ष वाचवा, स्वच्छ भारत मिशन योजनेतील एक कदम स्वच्छता की ओर व बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी प्रबोधनपर संदेश नातलग व आप्तमित्रांपर्यंत पोचविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com