राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूर

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही.

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला.

मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत पॅरोलवर 30 दिवसांची रजा मंजूर केली.

याचिकेत नलिनीने म्हटले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून कारावासात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही.

मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी तिला सहा महिन्यांची सुटी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. यावर न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एम. निर्मलकुमार यांनी तिला पॅरोल मंजूर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi assassination convicts parole has approved for 30 days