राजस्थान : सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधींची भेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

सचिन पायलट यांनी त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र आता पायलट यांचे हे बंड फसल्याचं दिसत आहे.

जयपूर - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बंड केल्यानंतर काँग्रेसनं सचिन पायलट यांची हकालपट्टीही केली होती. दरम्यान, सचिन पायलट यांनी त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र आता पायलट यांचे हे बंड फसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे सचिन पायलट पुन्हा पक्षात परतण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट महत्वाची ठरणार आहे. सचिन पायलट यांच्या गटाने गेहलोत यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी पक्षासमोर ठेवल्याची चर्चाही होत आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पायलट यांनी राहुल गांधींची भेट घेतली असून ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. राजस्थानमधील प्रश्न लवकर सोडवू असं अश्वासन त्यांना पक्षाकडून देण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीवेळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हेदेखील उपस्थित होते.

राहुल गांधींच्या गटातले नेते असलेल्या सचिन पायलट यांच्या अचानक बंडखोऱीने राजस्थानातील काँग्रेसच्या सत्तेचा पेच निर्माण झाला होता. यानंतर गेहलोत आणि पायलट यांच्यातील वादही समोर आले. त्यावेळी प्रियांका गांधी यांनीही सचिन पायलट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र प्रियांका गांधींशी बोलल्यानंतर सचिन पायलट यांची उप मुख्यमंत्री पद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तरीही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पायलट यंच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. 

आणखी वाचा - राम मंदिराची वजनदार घंटा तयार करायला लागणार 4 महिने

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पायलट यांच्याबाबत चर्चा सुरु झाली होती. पायलट यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असे अंदाज वर्तवले जात होते. याला स्वत: पायलट यांनीच फेटाळून लावत भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी सचिन पायलट यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठीच राहुल गांधी आणि सचिन पायलट यांची भेट होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले असतील असे संकेत दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajsthan congress crisis sachin pilot meet rahul gandhi