राज्यसभेच्या १३ जागांसाठी निवडणूक, या राज्यांकडे भाजपचं लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya sabha Election 2022

राज्यसभेच्या १३ जागांसाठी निवडणूक, या राज्यांकडे भाजपचं लक्ष

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. आता येत्या मार्च आणि जून महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमध्ये (Rajya sabha Election 2022) बहुमत मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसतेय. तसेच काँग्रेसकडून (Congress) देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. येत्या १३ मार्चला आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड, त्रिपुरा आणि पंजाब येथे १३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

हेही वाचा: राज्यसभा सचिवालयामध्ये पर्सनल असिस्टंटसह कित्येक पदांसाठी नोकरीची संधी

आसाम : राज्यसभेतील खासदार राणी नरह आणि रिपुन बोरा यांच्या जागा २ एप्रिल रोजी रिक्त होणार आहेत. या दोन जागांसाठी आसाममध्ये मतदान होणार असून या दोन्ही जागा भाजपप्रणित एनडीएला मिळेल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला आहे. भाजपने पवित्रा मार्गेरिटा यांना, तर युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) ने रुंगव्रा नरझारी यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसने रिपून बोरा यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसला राज्यसभेची जागा राखण्यासाठी आसामच्या 42 मतांची गरज आहे. काँग्रेसचे 28 आमदार, AIUDF चे 15 आमदार, CPM च्या 1 आमदाराच्या पाठिंब्याने, काँग्रेसने 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. अनेक विरोधी आमदार त्यांच्या सहयोगी UPPL च्या उमेदवाराला मतदान करतील आणि दोन्ही जागा एनडीएला मिळतील, असा भाजपचा दावा आहे.

हिमाचल प्रदेश : 68 जागांच्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत 43 जागा असलेल्या भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आणि हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे (HPU) माजी कुलगुरू प्रो सिकंदर कुमार यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण काँग्रेसने त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिला नाही.

केरळ : केरळमध्ये तीन जागांसाठी मतदान होणार असून काँग्रेसकडून जेबी माथेर यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, तर सत्ताधारी एलडीएफने सीपीआय(एम) राज्य समितीचे सदस्य ए. ए. रहीम आणि सीपीआय नेते पी संतोष कुमार यांना उमेदवारी दिली आहे. 140 आमदारांच्या विधानसभेत एलडीएफकडे 99 जागा असल्याने, एलडीएफ दोन जागा जिंकण्याची शक्यता आहे, तसेच काँग्रेसला एक जागा जिंकता येईल असं जाणकार सांगतात.

नागालँड : एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड केली. त्या राज्यातून राज्यसभेत निवडून येणाऱ्या महिला ठरल्या आहे. राज्य भाजप महिला शाखेच्या प्रमुख कोन्याक या निवडणुकीसाठी एकमेव उमेदवार होत्या.

त्रिपुरा : विद्यमान खासदार झरना दास बैद्य 2 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. या एका जागेसाठी राज्यातील भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष डॉ. माणिक साहा यांना उमेदवारी दिली आहे. डाव्या आघाडीने सीपीआय(एम) चे ज्येष्ठ नेते भानू लाल साहा यांना उमेदवारी दिली आहे. 60 पैकी 40 जागा असलेला भाजप राज्यसभेची एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पंजाब : पंजाब निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवर विजय मिळवल्यामुळे आनंदित झालेल्या AAP ने पंजाबचे प्रभारी राघव चड्ढा, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि संजीव अरोरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. सर्व पाचही जण बिनविरोध निवडून आले आहेत.

Web Title: Rajyasabha Election 2022 Polls On 13 Seats 13 March In Six States

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpCongress
go to top