अवघी अयोध्या राममय!; देशभरात उत्साहाचे वातावरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 5 August 2020

मंदिराच्या या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण दिले असून त्यात १३५ संतांचाही समावेश आहे. मोदींच्या हस्ते यावेळी ४० किलो वजनाच्या चांदीच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात येईल.

लखनौ/अयोध्या - ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी अवघी अयोध्या नगरी सजली असून शरयू तीर भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (ता. ५) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी देशभरातील धार्मिक स्थळांवरून पवित्र जल आणि मृत्तिका आणण्यात आली आहे. मंदिराच्या उभारणीसाठीची अनुष्ठाने आणि अन्य धार्मिक विधींना तीन दिवसांपूर्वीच सुरवात झाली होती.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे तीन तास अयोध्यानगरीमध्ये व्यतीत करतील. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीस शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंदिराच्या या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण दिले असून त्यात १३५ संतांचाही समावेश आहे. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त पाचजण असतील. मोदींच्या हस्ते यावेळी ४० किलो वजनाच्या चांदीच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात येईल.  या सोहळ्यानिमित्त अयोध्येत ५१ हजार लाडूंचे वाटप होणार असून भूमिपूजनात सहभागी पाहुण्यांना चांदीचा शिक्का भेट देण्यात येईल.  शरयू नदीच्या तीरावर काल सायंकाळी रोषणाई करण्यात आली होती.

असा असेल पंतप्रधानांचा दौरा
स. १०.३५ : हेलिकॉप्टरमधून अयोध्येकडे
स.११.४०: हनुमान गढी येथे दर्शन 
दु. १२.००: राम जन्मभूमी येथे पोचणार
१२.१० : रामलल्ला विराजमानचे दर्शन
१२.१५: पारिजातकाच्या रोपट्याचे रोपण
१२.३०: कार्यक्रमांना सुरवात
१२.४४ ते १२.४५ : भूमिपूजन
दु. २.०५:  साकेत महाविद्यालयाकडे प्रयाण
२.२० :  लखनौकडे रवाना

ram mandir bhumi pujan live : PM मोदी दिल्लीहून अयोध्येच्या दिशेने रवाना

कलशाने स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पाच हजार शंभर एवढे कलश तयार करण्यात आले असून त्यातील काही कलशांचा वापर हा प्रत्यक्ष विधीप्रसंगी केला जाणार असून काही पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाईल त्या भोवती ठेवले जातील. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रामार्चन पूजाविधी सुरू
राम मंदिर भूमिपूजनाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी मंगळवारी रामार्चन पूजाविधीला प्रारंभ झाला. पुजारी सत्यनारायण दास यांनी दिलेल्या माहितीनुसार,  या पूजेचे एकूण चार टप्पे आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात सर्व प्रमुख देवतांना आवाहन, दुसऱ्या टप्प्यात अयोध्या नगरीची पूजा, सेनाप्रमुखांचे पूजन, तिसऱ्या टप्प्यात राजा दशरथ, कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांची पूजा होईल. मग लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे पूजन होईल. चौथ्या टप्प्यात रामाची पूजा होईल.

अयोध्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram mandir bhumi pujan live updates Narendra Modi Ayodhya