आता राममंदिर निर्णय लवकरच येईल : संघ 

पीटीआय
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे. 

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी खटल्याची सुनावणी तीन सदस्यीय पीठासमोर 29 ऑक्‍टोबरपासून घेण्याचा जो निर्णय केला त्याचे संघ स्वागत करतो. यामुळे रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर व "न्यायोचित' लागेल, असा विश्‍वास संघाला वाटतो. 
न्यायालयाचा आजचा निकाल हा मुस्लिम पक्षकारांना झटका मानला जातो. न्यायालयाचा यापूर्वीचा निर्णय मोठ्या म्हणजे पाच सदस्यीय घटनापीठाकडे पाठविण्याची त्यांची मागणी आज न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 30 सप्टेंबर 2010 रोजी आलेल्या निकालावरील आव्हान याचिकेवर येत्या 29 ऑक्‍टोबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. या निकालानंतर राजकीय चर्चाही सुरू झाली आहे.

अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंस खटल्याचा निकाल लवकरच लागेल, असा विश्‍वास संघपरिवारातून व्यक्त होत आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, की आजच्या निकालाने अयोध्येतील जन्मभूमीवर राममंदिर निर्माणाचा रस्ता मोकळा झाला आहे. यामुळे मूलभूत अधिकारांचाही विजय झाला असून, राममंदिराच्या मार्गातील अडसर दूर झाले आहेत. बाबरी मशीद खटल्यातील एक पक्षकार इकबाल अन्सारी यांनी मात्र ताजा निकाल हा मंदिर-मशीद वादावरील नाही व त्यामुळे मुस्लिमांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram temple decision will come soon Sangh