राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती आणखी मजबूत होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ramdas Athawale

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती झाली हे स्वागतार्ह आहे.

Ramdas Athawale : राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती आणखी मजबूत होईल

नवी दिल्ली - ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती झाली हे स्वागतार्ह आहे. यामुळे राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती आणखी मजबूत होईल. प्रवाहाबरोबर चालले की दलित समाजासाठीच ते फायद्याचे ठरते हे यापूर्वीही दिसून आले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यातील सत्ताधारी युतीबरोबर यावे,‘ असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘सकाळ' ला सांगितले.

शिंदे गटाबरोबर युती झाल्यावर कवाडे यांनी ‘सर्वसामान्यात मिसळणारा, धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्रला लाभला आहे,' अशी स्तुतीसुमनेही उधळली. मंत्री आठवले यांची, त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये आज जाहीर सभा होती. यंदा होणाऱया त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठी (आठवले गट) भाजपने दोन जागा सोडाव्यात अशी मागणी त्यांनी केली.

आठवले यांनी दूरध्वनीवरून सकाळशी बोलताना कवाडे यांच्या युतीबरोबर येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ठाकरे यांच्याबरोबर जाण्यात शहाणपणा नाही हे ओळखून भारिप-बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनीही राज्यातील शिवशक्ती बरोबर यावे असे आवाहन करून आठवले म्हणाले की भाजपबरोबर या, असे आवाहन मी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना केले होते.

‘‘दलित समाजाने सत्तेपर्यंत पोहोचले पाहिजे,‘ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. मात्र दलित समाज स्वतःच्या ताकदीवर एकहाती देशाच्या तसेच राज्याच्या सत्तेत येऊ शकत नाही हे दिसत आहे. त्यामुळे प्रवाहाबरोबर चालले तरच समाजाचा फायदा मिळतो. आंबेडकरी चळवळीनेही कवाडे यांच्याप्रमाणे निर्णय घेतला तर समाजाचेच भले होईल. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्यातच रिपब्लिकन पक्षातील गटांचा भलेपणा आहे हे नेत्यांनी ओळखावे.

दरम्यान महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाबरोबर युती करणारे कवाडे यांना लगेचच मंत्रिपद मिळण्याची शक्य दिसत नसल्याचेही आठवले यांनी सांगितले. ते म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवले तर कवाडे गटाला एखादे महामंडळ मिळू शकते.