
EDs Major Action in Ranya Rao Gold Smuggling Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कर्नाटकातील अभिनेत्री रान्या रावची सोने तस्करीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तब्बल ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
हा खटला हर्षवर्धनी रान्या उर्फ रान्या रावशी संबंधित आहे, जी या तस्करी रॅकेटची मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले जाते. ईडीच्या मते, रान्या आणि तिच्या सहकाऱ्यांनी दुबई, युगांडा आणि इतर देशांमधून बेकायदेशीरपणे सोने भारतात आणले आणि त्याच्या विक्रीतून मिळणारे मोठे उत्पन्न हवालाद्वारे बाहेर पाठवले आणि ते पुन्हा तस्करीसाठी वापरले.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तक्रारीवरून ७ मार्च २०२५ रोजी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली. ३ मार्च २०२५ रोजी रान्या रावला बंगळुरू विमानतळावर १४.२१३ किलो परदेशी सोन्यासह पकडण्यात आले, ज्याचे मूल्य सुमारे १२.५६ कोटी रुपये होते. तिच्या घराची झडती घेतली असता, २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे दागिनेही सापडले होते.
ईडीच्या चौकशीदरम्यान रान्या राव यांनी सर्व आरोप फेटाळले. परंतु तिचा मोबाईल फोन, डिजिटल डेटा, प्रवास कागदपत्रे, कस्टम डिक्लेरेशन आणि चॅट्सवरून हे स्पष्ट झाले की ती या तस्करी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग होती. ईडीने तिच्याविरुद्ध पुरेसे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा केले आहेत.
ईडीचा तपास अजूनही सुरू आहे. उर्वरित बेकायदेशीर मालमत्तांचा शोध घेतला जात आहे आणि विमानतळांवर रान्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासली जात आहे.