esakal | अदभूत ! चक्क ११८ वर्षांनंतर ‘ही’ दुर्मिळ वनस्पती भारतात सापडली
sakal

बोलून बातमी शोधा

Rare Orchid Species Eulophia Obtusa In Dudhwa tiger reserve

१९ व्या शतकातील  गंगा नदीच्या मैदानी भागातून काही वैज्ञानिकांनी ही वनस्पती येथे आणली होती. पण, मागील १०० हून अधिक वर्षांपासून ही प्रजाती कोणालाही पाहावयास मिळाली नाही. कोणती आहे हि वनस्पती? त्यासाठी वाचाच ही बातमी. 

अदभूत ! चक्क ११८ वर्षांनंतर ‘ही’ दुर्मिळ वनस्पती भारतात सापडली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तरप्रदेश :  उत्तरप्रदेशच्या दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये हे ग्राउंड ऑर्किड फूल पाहावयास मिळाले.
भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दुधवा टायगर रिझर्व्ह असून तेथे हे दुर्मिळ असे फूल पाहायला मिळाले. तब्बल ११८ वर्षांनंतर ऑर्किड या दुर्मिळ फुलाची एक प्रजाती भारतामध्ये  सापडली आहे. ग्राउंड ऑर्किड अशी ओळख असलेल्या या फुलाचे वैज्ञानिक नाव  एयुलोफिया ओबटूसा ( Eulophia Obtusa ) असे आहे. 

उत्तरप्रदेशच्या दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये वन अधिकारी तसेच अन्य वन्यजीव तज्ज्ञाच्या निरीक्षणादरम्यान आर्किड प्रजातीचे एयुलोफिया ओबटूसा ( Eulophia Obtusa ) हे फूल पाहायला मिळाले. हे फुल शेवटचे १९०२ साली पीलीभीतमध्ये पाहायला मिळाले होते पण आता ते भारतात पाहावयास मिळाले आहे. इंग्लंडच्या क्यू हर्बेरियमच्या या दस्तावेजात या विशिष्ट फुलाची नोंद आहे. 

दुर्मिळ प्रजातीचा शोध घेणारे संजय पाठक यांच्या म्हणण्यानुसार मागील महिन्यात म्हणजे ‘३० जून रोजी त्यांना ऑर्किडच्या या दुर्लभ प्रजातीचं फूल दृष्टीस पडले. या फूलांची छायाचित्रे आम्ही बांगलादेशमधील वनस्पतिशास्त्रज्ञ मोहम्मद शरीफ हुसैन सौरव यांना पाठवली. मोहम्मद सौरव यांच्या म्हणण्यानुसार  त्यांनी हे फूल एयुलोफिया ओबटूसा ( Eulophia Obtusa ) प्रजातीचे असल्याचे आम्हाला सांगितले. 

हेही वाचा : भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी

देशातील ऑर्किडच्या प्रजातींच्या नोंदी 
भारतामध्ये ऑर्किडच्या १,२५६ प्रजाती आढळतात. त्यापैकी स्थानिक स्वरुपाच्या ३८८ प्रजाती आहेत. देशात एकूण आढळणाऱ्या आर्किडच्या प्रजातींपैकी तब्बल ३०० स्थानिक प्रजाती या पश्चिम घाटात आढळतात. तर यांच्यापैकी महाराष्ट्रात तब्बल १०५ स्थानिक प्रजाती या आढळतात. वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर (WWF) या संस्थेतील भारताचे समन्वयक असलेले  डॉक्टर मुदित गुप्ता म्हणाले की, ‘लवकरच या फुलासंदर्भात एक व्यापक अहवाल हाती घेण्यात येईल .