भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

याआधी भारतातील दोन कंपन्यांनी कोरोनावर औषध तयार केलं आहे. आता आणखी एका औषध निर्मिती कंपनीला कोरोनावर औषधासाठी डीजीसीआय़ने परवानगी दिली आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. याआधी भारतातील दोन कंपन्यांनी कोरोनावर औषध तयार केलं आहे. आता आणखी एका औषध निर्मिती कंपनीला कोरोनावर औषधासाठी डीजीसीआय़ने परवानगी दिली आहे. Mylan NV या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिवीरचं जेनेरिक व्हर्जन बाजारात आणण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी सर्वात आधी गिलीट सायन्सेसनं रेमडेसिवर औषध लाँच केलं आहे. Mylan NV ने म्हटलं की, या औषधाची 10 एमजीची बाटली 4 हजार 800 रुपयांना मिळेल. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

याआधी सिप्ला आणि हेटेलो यांना डीसीजीआयने परवानगी दिली आहे. आता Mylan ला रेमडेसीवीर 100 एमजी बाटलीच्या निर्मितीसाठी परवानगी दिली असून भारतातील कोरोनावर उपचारासाठी याची मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याचं कंपनीच्यावतीने सांगण्यात आलं आहे. 

हे वाचा - कोरोनाचा बाजार! फक्त अडीच हजार रुपयात निगेटिव्ह रिपोर्ट हातात

कोरोनावर औषधाला परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने माहिती देताना औषधाचे नावही सांगितलं आहे. Desrem असं नाव कंपनीने या औषधाला दिलं आहे. सिप्लाने Cipremi हे औषध 5 हजार रुपये किंमतीत तर हेटेलोने Covifor हे औषध 5 हजार 400 रुपयांत तयार केलं आहे. 

Mylan NV ने म्हटलं की भारतातच रेमडेसिवीरचं औषध तयार करणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. गंभीर असलेल्या वृद्ध आणि मुलांसाठी या औषधाचा वापर केला जाईल. 

हे वाचा -  मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला

रेमडेसिवीरच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये समोर आलं होतं की जेव्हा हे औषध कोरोनाबाधितांना दिलं जातं तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. त्यानंतरच जगभरात रेमडेसिवीरच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी या औषधाला युरोपीय आयोगानेही काही अटींसह मंजुरी दिली आहे. याचा वापर आता युरोपातील देशांमध्ये करण्यात येणार आहे. 

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 लाखांच्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 6 लाख 97 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 4 लाख 24 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर देशात कमी असून आतापर्यंत 19 हजार 693 जणांचा मृ्त्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india mylan get permission for remdesivir use on covid 19 patient