रतन टाटा आणि नस्ली वाडियांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने केली 'ही' सूचना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • सर्वोच्च न्यायालयाची रतन टाटा आणि नस्ली वाडियांना सूचना

नवी दिल्ली : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा आणि बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी वादावर चर्चेतून तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

टाटा समूहातील काही कंपन्यांच्या संचालक मंडळातून 2016 मध्ये वाडिया यांना काढून टाकण्याचा निर्णय टाटा सन्सच्या संचालक मंडळाने घेतल्यानंतर वाडिया यांनी रतन टाटा आणि टाटा सन्सच्या इतर संचालकांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले, की तुम्ही दोघेही प्रगल्भ आहात. दोघेही उद्योगविश्‍वात नेतृत्वस्थानी आहात. तुमच्यातील वादावर आपसांत चर्चा करून तुम्ही मार्ग का काढत नाही? एकत्र बसून चर्चा करून यातून मार्ग काढता येणार नाही का? यासाठी न्यायालयातील खटल्याच्या माध्यमातूनच पुढे जायला हवे का?

सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर...

याआधी या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्या वेळी उच्च न्यायालयाने वाडिया यांना संचालक मंडळातून दूर करण्यात बदनामी किंवा अब्रुनुकसानीचा मुद्दा नव्हता, असे मत व्यक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी 13 जानेवारीला ठेवली आहे. वाडिया यांच्या वकिलाने आपल्या अशिलाशी या खटल्यासंदर्भात अधिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंतची मुदत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratan Tata and Nusli Wadia should talk it out says SC in defamation case