Kerala Floods : काही भागांत 'रेड अलर्ट'; पूरबळींची संख्या 88 वर

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

- जनजीवन सुरळीत
- मात्र पावसाची शक्‍यता कायम 

तिरुअमंतपुरम ः केरळमधील उत्तर भागातील पूरस्थिती हळूहळू सुधारत असून, जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र मध्य केरळमध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत तीन जिल्ह्यांत मंगळवारी अतिदक्षतेचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.

राज्यातील पुरात बळी गेलेल्यांची संख्या 88 वर पोचली आहे. पाऊस व पुरामुळे कर्नाटकची दैना उडाली होती. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) आता तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. 

केरळमधील अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की या जिल्ह्यांत आज "रेड अलर्ट' देण्यात आला. उत्तर भागातील मलप्पुरम आणि कोझिकोड येथे बुधवारी (ता. 14) जोरदार पाऊस पडेल, अशी शक्‍यता "आयएमडी'ने व्यक्त केली आहे. या जिल्ह्यांत 20 सेंटिमीटर पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतेक भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असे "आयएमडी'चे तिरुअनंतपुरम येथील संचालक के. संतोष यांनी सांगितले.

कोल्लम, पठणमतिट्टा, कोट्टयम, पलक्कड, त्रिसूर आणि मल्लपूरममध्ये आज "ऑरेंज अलर्ट' दिला होता. अनेक राज्यांत आज शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली होती. काही विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. काही रेल्वेगाड्या रद्द केल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. 

केरळमधील स्थिती 
88 एकूण बळी 

40 बेपत्ता 

2.52 लाख निवारा केंद्रांतील नागरिक 

1,332 निवारा केंद्रांची संख्या

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मलप्पुरम आणि वायनाडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. ""सरकार तुमच्यासोबत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सरकार सध्या बचावकार्याला प्राधान्य देत असून, पुनर्वसनासाठी उपाययोजनांवर भर देणार आहे,'' अशी ग्वाही त्यांनी वायनाडमधील मेप्पडीमधील निवारा केंद्रातील पूरग्रस्तांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in three Kerala districts; flood toll climbs to 88