लाल किल्ला हिंसाचार : दिल्ली पोलिसांनी जारी केले 20 जणांचे फोटो

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर हिंसाचारात सहभागी असल्या प्रकरणी आणखी 20 लोकांचे फोटो प्रसारीत केले आहेत.

नवी दिल्ली - लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळाप्रकरणी दिल्ली पोलिस आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी पुन्हा एकदा संशयित आरोपींचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर हिंसाचारात सहभागी असल्या प्रकरणी आणखी 20 लोकांचे फोटो प्रसारीत केले आहेत. तसंच त्यांची ओळख पटवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याआधी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं 26 जानेवारीला झालेल्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी 12 जणांचे फोटो जारी केले होते. 

फोटो प्रसारीत करण्यात आलेल्यांवर लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारावेळी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याआधी दिल्ली पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी 26 जानेवारीला हिंसाचाराशी संबंधित एक हजार व्हिडिओ मिळाल्याचे सांगितले होते. पोलिस याप्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेत आहे. 

प्रजासत्ताक दिनी हिंसाचार प्रकरणी 12 जणांचा शोध दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एसआयटी पथक करत आहे. या प्रकरणी तपासही एसआयटी करत असून 12 जणांच्या हातात रॅलीवेळी काठ्या असल्याचं दिसत आहेत. त्यांनी लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी हिंसाचार करत पोलिसांवरही हल्ला केला होता. दिल्ली पोलिस दंगेखोरांची ओळख पटवण्याचं काम करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हिंसाचार करणाऱ्यांचे फोटो तपासले जात आहेत.

हे वाचा - करोनानंतर आता नवा धोका! रशियात बर्ड फ्ल्यूच्या नव्या विषाणूचं माणसामध्ये संक्रमण

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. तेव्हा हिंसाचार भडकल्या प्रकरणी दिल्ली पोलिस पंजाबचा गॅँगस्टर लक्खा सिंह सिधाना याचा शोध घेत आहेत. दरम्यान, फरार असलेला लक्खा सिंह याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. तसंच पोलिसांना थेट आव्हान देत 23 फेब्रुवारीला आणखी एक आंदोलन करणार असल्याचंही घोषणा केली. हे आंदोलन बठिंडात करणार आहे असं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: red fort violence delhi police 20 new photos release