महागाईचा देशात भडका

पीटीआय
मंगळवार, 14 जानेवारी 2020

डिसेंबर २०१८ च्या तुलनेत मागील महिन्यात अन्नधान्यांच्या भावात १४.१२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढीचा आलेख डिसेंबर महिन्यात चढता राहिला असून, ती ७.३५ टक्‍क्‍यांवर गेली आहे. किरकोळ चलनवाढीने रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यमकालीन ४ टक्के उद्दिष्टाला मागे टाकले असून, ती मागील पाच वर्षांतील उच्चांकीच्या पातळीवर पोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किरकोळ किंमत निर्देशांकाच्या आधारे किरकोळ चलनवाढ ठरविली जाते. यात अन्नधान्याच्या भावाचा वाटा सर्वाधिक असतो. त्यामुळे अन्नधान्याच्या भावात वाढ झाल्यास चलनवाढीवर त्याचा मोठा परिणाम होतो. याआधी किरकोळ चलनवाढ जुलै २०१४ मध्ये ७.३९ टक्‍क्‍यांवर गेला होती.

सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या भावात वाढ झाल्याने किरकोळ चलनवाढीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत मागील महिन्यात अन्नधान्यांच्या भावात १४.१२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ती उणे २.६५ होती. भाजीपाल्याच्या भावात तब्बल ६०.५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्यामुळे चलनवाढीत वाढ झाली आहे.  रिझर्व्ह बॅंकेच्या जुलै २०१६च्या महागाई दराच्या धोरणानुसार, किमान आणि कमाल दर २ ते ६ टक्‍क्‍यांदरम्यान असणे अपेक्षित आहे. डिसेंबरमध्ये त्यात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत किरकोळ चलनवाढीचा दर जास्त राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त करून तो ४.७ ते ५.१ टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे म्हटले होते. डिसेंबर २०१९च्या किरकोळ चलनवाढीने रिझर्व्ह बॅंकेचे अंदाज खोटे ठरविले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retail inflation graph continued to rise in December