मोदीजी, माझ्या मुलासाठी मदत करा; मी जातोय...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मोदीजी, मी माझ्या तरुण मुलासाठी काही करू शकलो नाही. मुलाला गायक होण्यासाठी मदत करा...

नवी दिल्ली : मोदीजी, मी माझ्या तरुण मुलासाठी काही करू शकलो नाही. मुलाला गायक होण्यासाठी मदत करा, असे लिहून एका हवाई दलामधून निवृत्त झालेल्या अधिकाऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बिजन दास (वय 55) असे आत्महत्या केलेल्या माजी अधिकाऱयाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील खुलदाबाद येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. मुळचे आसाम येथील रहिवासी असलेले दास यांनी आत्महत्येपूर्वी पाच पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दास यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये देशातील आर्थिक मंदीसाठी माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांना जबाबदार धरले आहे. शिवाय, मंदीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

दास यांच्या खोलीत सुसाईड नोट व्यतिरिक्त अत्यंविधीसाठी 1500 रुपये आणि हॉटेलच्या भाड्यासाठी 500 रुपये मिळाले आहेत. दास यांनी सुसाईड नोटमध्ये युपीए सरकारमधील घोटाळे आणि चुकीच्या आर्थिक धोरणांचा उल्लेख केला. दास यांनी सुसाईड नोट मध्ये लिहीले आहे की, आर्थिक मंदीमुळे आपण निवृत्तीनंतर काहीही करू शकलो नाही. एखाद्या सरकारने चुकीची आर्थिक निती केली, तर त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. त्याचा परिणाम अनेक वर्षांनंतर दिसून येतो, म्हणून आर्थिक मंदीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर तत्काळीक परिणाम झाला आहे. मात्र देशातील आर्थिक मंदीसाठी या निर्णयांना जाबाबदार धरणे योग्य नाही. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी झालेल्या अटकेचा उल्लेखही केला आहे.'

दास यांनी पुढे लिहीले आहे की, 'माझ्या मुलाचे नाव विवेक दास असून, त्याला गायक व्हायचे आहे. विवेकने 'सारे गा, मा, पा...' मध्ये सहभाग घेतला आहे. परंतु, माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. मोदीजी विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired IAF officer writes suicide note to PM Modi