नदीचे पाणी अडल्याने सरोवराची निर्मिती;गाळामुळे अडला ऋषीगंगा नदीचा प्रवाह

वृत्तसंस्था
Saturday, 13 February 2021

पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने जर हे सरोवर फुटले तर डोंगराळ भागातून पाणी वेगाने खाली वाहण्याचा व त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून गाळ साठल्याने ऋषीगंगा नदीचा वरील भागातील प्रवाह रोखला गेला आहे. नदी वाहण्याचे थांबल्याने त्याला सरोवराचे रूप आले आहे. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने जर हे सरोवर फुटले तर डोंगराळ भागातून पाणी वेगाने खाली वाहण्याचा व त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी चिंतेचे कारण नसले तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत शुक्रवारी म्हणाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तराखंड जलतांडव ज्या ठिकाणी झाले तेथील उपग्रह छायाचित्र आणि तज्ज्ञांच्या अहवालात हा धोका निदर्शनास आणून दिला आहे. अजून एक संकट टाळण्याच्यादृष्टिने संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ), राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अन्य संस्था नियोजन करीत आहे. सरोवर तयार झाल्याच्या घटनेवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे पथक सरोवराजवळ पोचले आहे. ड्रोन, मानवविरहित विमाने व काही संस्था पाहणी करीत आहे, असे ‘एनडीआरएफ’चे सरसंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. घटनास्थळावरील सत्य स्थिती पाहून त्याचे विश्‍लेषण करून योग्य कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऋषीगंगेवरील कृत्रिम सरोवराचे व्हिडिओ छायाचित्रण हेलिकॉप्टरद्वारे केले असून हे सरोवर फुटबॉलच्या मैदानापेक्षा तिपटीने मोठे आहे, असे प्रधान म्हणाले. पुराचा अंदाज व्यक्त करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने ट्विटरवर ऋषीगंगा नदीवर ३५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर उंचीचे व १० अंश उताराचे सरोवर तयार झाले असल्याची माहिती दिली आहे. 

जोशीमठ येथे रैणी गावाजवळ सरोवर निर्माण झाले असल्याची माहिती समजली. ही बाब चिंतेची नसली तरी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञ यावर काम करीत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे तज्ज्ञांना पाठविण्याचे नियोजन आम्ही करीत आहेत. 
त्रिवेंद्रसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishiganga river in Chamoli district of Uttarakhand