भाजपला झटका! कृषी कायद्यावरुन NDAतील मित्रपक्षाने दिली साथ सोडण्याची धमकी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे

नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे (RLP) संयोजक आणि खासदार हनुमान बेनीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी मोदी सरकारकडे तिन्ही कृषी कायदे परत घेण्याची मागणी केली आहे. तसेच असं न केल्याच एनडीए सोडण्याची धमकी दिली आहे. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने मोदी सरकारने नव्याने लागू केलेल्या कृषी कायद्यांना वापस घेण्याची मागणी केली आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर एनडीएचा घटक पक्ष राहण्याबाबत पुनर्विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आरएलपीचे संयोजक आणि राजस्थान नागौर लोकसभा मतदारसंघातील बेनीवाल यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संबोधून ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, अमित शहाजी, ''देशात चालणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या भावना पाहता कृषी संबंधित आणण्यात आलेले तीन कायदे तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या जाव्यात. शेतकऱ्यांसोबत चर्चा होण्यासाठी त्यांना योग्य जागा दिली जावी.''

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोदींचे वाराणसीतून उत्तर 

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीची घटक पक्ष आहे. आरएलपीची खरी ताकत शेतकरी आणि जवान आहेत. त्यामुळे यासंदर्भात त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर पक्षाला शेतकऱ्यांच्या हितामध्ये निर्णय घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत आम्हाला एनडीएचा घटक पक्ष राहण्याबाबत पूनर्विचार करावा लागेल, असं बेनीवाल म्हणाले आहेत. 

दरम्यान, नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी उत्तर दिल्लीतील बुराडी मैदानावर गेल्यानंतर चर्चा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अमान्य केला आहे. कोणत्याही अटीवर चर्चा करण्यास तयार नसल्याचे आंदोलक शेतकऱयांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत जाण्यासाठीचे सर्व पाच मार्ग बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RLP warn nda to leave alliance on farm bill