रामाचे काम होणार आणि त्यावर देखरेखही होणार : मोहन भागवत

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

उदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर येथील संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी एकही शब्द न बोलणाऱ्या आरएसएसने पुन्हा या विषयाबाबत भाष्य केले आहे. यात थेट राम मंदिराचा उल्लेख नसला तरी त्यांचा रोख त्याच दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजप सरकारच्या काळात राम मंदिराचा मुद्दा मार्गी न लागल्याने संघाने नाराजी व्यक्त केली होती. आता कोणाचेही सरकार आले, तरी राम मंदिराच्या कामाल सुरवात करणारच, असे संघाच्या एका नेत्याने म्हटले होते. मात्र निवडणुकीच्या प्रचारात या बद्दल संघाकडून कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती.

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता भागवतांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे. सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर आणि बाबरी मशीदीचा खटला प्रलंबित आहे. आता राम मंदिराबाबत मोदी सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Chief Mohan Bhagwat speaks about Ram Mandir at Udaipur