कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपये अनुदान - नित्यानंद राय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Help

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना केंद्र सरकारच्या वतीने आर्थीक मदत दिली जाईल. असे आश्वासन नरेंद्र मोदी सरकारने दिले होते.

Covid-19 : कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपये अनुदान - नित्यानंद राय

नवी दिल्ली - कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकार 50,000 रुपये अनुदान देत आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना केंद्र सरकारच्या वतीने आर्थीक मदत दिली जाईल. असे आश्वासन नरेंद्र मोदी सरकारने दिले होते. आतापर्यंत किती जणांना देशात अशी मदत दिली गेली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राय यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कोविड महामारीत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली जात आहे.

महामारीच्या लाटे दरम्यान रूग्णांना मदत करणारे किंवा तयारीच्या कार्यात गुंतलेल्या व कोवीडग्रस्त होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्यांच्या नातेवाईकांना मदत केली जात आहे. मृत्यूचे कारण कोविड म्हणून प्रमाणित केल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत दिली जाते.

या महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका व एकंदर आलेल्या आर्थिक विस्कळीतपणामुळे गरीब लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि या महामारीचा अन्न सुरक्षेवरील परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त मोफत अन्नधान्य (तांदूळ/गहू) वितरित करण्याचाही निर्णय घेतला. सुमारे ८० कोटी गरीबांना याचा लाभ देण्यात आला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, अंत्योदय अन्न योजना, आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते.