
‘सुखोई’चे आधुनिकीकरण तूर्त लांबणीवर
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय हवाईदलालाही बसला आहे. भारतीय हवाई दलाने ‘सुखोई -३० एमकेआय’ ही विमाने अद्ययावत करण्याची योजना तूर्त थांबविली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या साह्याने आपल्याकडील ८५ विमाने अद्ययावत करण्याची योजना भारतीय हवाई दलाने आखली होती.
सध्याची स्थिती पाहता ती योजना आता थांबविण्यात आली आहे. तसेच नवी अत्याधुनिक १२ ‘एसयू-३०एमकेआय’ विमाने खरेदी करण्यासही काही विलंब लागू शकणार आहे. या कराराची एकूण किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतीय संरक्षण उत्पादने वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार विमानांमध्येही जास्तीत जास्त भाग भारतीय बनावटीचे वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुखोई-३० एमकेआय ही विमाने सप्टेंबर २००२पासून भारतीय हवाईदलात समाविष्ट करण्यात आली आहे.
हवाईदलाकडील ८५ सुखोई विमानांमध्ये अधिक शक्तीशाली रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला तोंड देण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे या विमानांची क्षमताही वाढणार होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय हवाईदलाला गरज पडेल तेव्हा टप्याटप्प्याने २७२ सुखोई विमाने रशियाकडून खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी ३०-४० विमाने पहिल्या टप्प्यात अद्ययावत करण्यात येणार होती.
सुटे भाग मिळण्यातही उशीर
रशिया व युक्रेन युद्धामुळे लढाऊ विमानांसाठीचे सुटे भाग मिळण्यासही उशीर होत आहे. परंतु, ही समस्या फार मोठी नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर भारताने आवश्यक त्या सुट्या भागांचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला त्याचा फार मोठा तुटवडा जाणविणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, काही काळाने याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे भारतीय हवाई दलाने परदेशी उपकरणांचा वापर नियंत्रित स्वरुपात ठेवला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.