S. Jaishankar : दहशतवादी पाकशी चर्चा नाहीच; एस. जयशंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India

S. Jaishankar : दहशतवादी पाकशी चर्चा नाहीच; एस. जयशंकर

नवी दिल्ली : दहशतवादाला पाठिंबा सुरू असेपर्यंत पाकिस्तानशी चर्चा अशक्य असल्याचे भारताने सोमवारी पुन्हा स्पष्ट केले. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेयरबॉक यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही भूमिका मांडली. त्यास जर्मनीनेही सहमती दर्शविली. बेयरबॉक दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या. द्वीपक्षीय संबंधांवर त्यांची जयशंकर यांच्याशी व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषदही झाली. जयशंकर यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचे संबंध, सीमेवर असलेले दहशतवादाचे आव्हान यावर चर्चा झाली. सध्याचे मुख्य आव्हान हेच आहे की दहशतवादाला खतपाणी घातले जात असताना पाकिस्तानशी चर्चा केली जाऊ शकत नाही. यावर जर्मनीनेही सहमती व्यक्त केली.

बेयरबॉक यांनी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या सुरात सूर मिसळताना काश्मीर प्रश्नावर भारताला नाराज करणारे विधान केले होते. काश्मीरमध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मध्यस्थीचा सल्ला देणाऱ्या बेयरबॉक यांच्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायावर आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि सीमेपलीकडील दहशतवाद संपुष्टात आणण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर, पाकिस्तानशी चर्चा नाही हे परराष्ट्र मंत्र्यांचे म्हणणे महत्त्वाचे मानले जात आहे.

बेयरबॉक यांनी या वर्षभरात दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठींचा दाखला देत द्वीपक्षीय संबंध दृढ झाल्याचा निर्वाळा दिला. सध्याच्या आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय परिस्थितीत दोन्ही देशांनी एकमेकांच्या सोबत उभे राहणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. तर, जयशंकर यांनी उभय देशांची सामरिक भागीदारी दोन दशकांहून दीर्घ असल्याचे नमूद केले. सोबतच, राजकीय देवाणघेवाण, वाढता व्यापार आणि गुंतवणूक यामुळे ही भागीदारी आणखी बळकट झाल्याचेही ते म्हणाले.

रशियावरून खडे बोल

रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यावरून भारताला लक्ष्य करण्याबद्दल जयशंकर यांनी युरोपिय महासंघाला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. भारताची ऊर्जेची गरज आणि प्राधान्यक्रम युरोपीय महासंघ ठरवू शकत नाही. युरोपने हवे तसे वागावे आणि भारताकडून वेगळी अपेक्षा ठेवावी हे कसे शक्य आहे. दहा देश मिळून रशियाकडून जेवढे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करतात त्यापेक्षा अधिक आयात एकट्या युरोपने केली आहे, अशा कानपिचक्याही जयशंकर यांनी दिल्या. पश्चिमेकडील देशांची तेलाची आयात भारतापेक्षा पाच ते सहा पटीने आणि कोळशाची आयात भारताच्या तुलनेत ५० टक्क्यांनी अधिक आहे. याकडेही परराष्ट्र मंत्र्यांनी लक्ष वेधले.