'शबरीमला मंदिर दर्शनासाठी खुले'

अजयकुमार
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यातील अयप्पा स्वामींचे शबरीमला मंदिर भाविकांसाठी आजपासून खुले करण्यात आले आहे.

तिरुअनंतपुरम : केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यातील अयप्पा स्वामींचे शबरीमला मंदिर भाविकांसाठी आजपासून खुले करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता कंदरारू महेश मोहनाररू यांनी गर्भागृहाचे दरवाजे उघडले आणि दर्शनासाठी रीघ लागली. आंध्र प्रदेशातून अय्यपा स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दहा महिलांना पोलिसांनी पांभा टेकडीवरूनच परत पाठविले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यातच मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पांभा येथील टेकडीवर भक्तांची गर्दी उसळली आहे. त्यात केरळबरोबरच तमिळनाडूतील भक्तांची संख्याही मोठी आहे. पुरुषांबरोबर अनके वयोवृद्ध महिलाही दर्शनासाठी आल्या आहेत.

मंदिराच्या दिशेने जाण्याआधी पोलिसांनी महिलांना वयाचा पुरावा सादर करण्यास सांगितला. त्यानुसार दहा महिला भाविकांना पोलिसांनी परत पाठवले. या महिलांनी दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला असता पोलिसांनी 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना सोडायचे नाही, असा आपल्याला स्पष्ट आदेश असल्याचे सांगत त्यांची मागणी धुडकावली. 

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

महिलांच्या मंदिर प्रवेशावर देवस्थानमंत्री सुरेंद्रन म्हणाले, की शबरीमला मंदिर हे काही प्रदर्शन करण्याची जागा नाही. त्यामुळे एखाद्या महिलेला मंदिरात प्रवेश नाकारला तर त्या महिलेने न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाची प्रत प्रवेश नाकारणाऱ्यांना दाखवावी, असेही ते म्हणाले.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार महिला आणि पुरुष समानतेच्या बाजूने असून, सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील महिला प्रवेशाच्या निर्णयाला स्थगिती दिली नसल्याने त्यांचा 28 सप्टेंबर रोजीचा आदेश आमच्यासाठी बंधनकारक असेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या महिलांना संरक्षण देणार नाही हे राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केले असले, तरी आपल्या या भूमिकेचा सरकार पुनर्विचार करत असल्याचे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sabarimalas restrictions were gone