गांधी कुटुंबिय अन् सचिन पायलट यांच्यातील पडद्यामागची कहाणी!

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 11 August 2020

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी सुरुवातीला सचिन पायलट यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही रंगली होती. चर्चेनंतरही प्रियांका गांधी सचिन पायलट यांच्या संपर्कात होत्या.

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. महिनाभराच्या राजकीय संघर्षमय परिस्थितीनंतर काँग्रेस कुटुंबियांनी अखेर सचिन पायलट यांचे मन वळवण्यात यश मिळवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पायलट यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी काँग्रेस हायकमांडने स्वतंत्र समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली.

सचिन पायलट यांची घरवापसी; पण काँग्रेसपुढे आता नवा पेच

बंडखोर नेत्यांवर कोणतीही कारवाई न करण्याच्या अटीवर पायलट गटाने गहलोत सरकारच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे. राजस्थानमधील 200 संख्याबळ असलेल्या विधानसभेत गेहलोत यांना 100 आमदारांचा पाठिंबा आहे. सचिन पायलट यांना 14 जुलै रोजी राजस्थान काँग्रेस अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. याशिवाय पायलट गटाच्या दोन मत्र्यांवरही कारवाई करण्यात आली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मतानुसार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिन पायलट यांना पक्षातून बाहेर जाऊ न देण्याची स्पष्ट भूमिका मांडली होती. गेहलोत यांनी ज्यावेळी सार्वजनिकरित्या सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधला त्यावेळी गेहलोत यांनी अशा प्रकारची टिपण्णी करु नये, असे आदेश हायकमांडकडून आले होते. 

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी सुरुवातीला सचिन पायलट यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही रंगली होती. चर्चेनंतरही प्रियांका गांधी सचिन पायलट यांच्या संपर्कात होत्या. अथक प्रयत्नानंतर सचिन पायलट अखेर राहुल गांधींची भेट घेण्यास तयार झाले.  एका बाजूला काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबियांच्या आदेशानुसार,  गेहलोत यांच्यासोबत होता. दुसरीकडे सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यात झालेल्या बैठकीवेळी प्रियांका गांधीही उपस्थितीत होत्या. या बैठकीनंतर प्रियांका गांधी यांनी पायलट गटाला आश्वस्त केल्याचेही बोलले जाते.  

आणखी वाचा - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी

काँग्रेस पक्षांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत सचिन पायलट यांना राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या गटातील नेत्यांना प्रमुख पदे देण्यात येतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून राजस्थानधील प्रकाराचे विवेचन करण्याचा घेतलेला निर्णयही सचिन पायलट पक्षात कायम राहण्यास तयार झाल्याचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. ही समिती पायलट गटाची नाराजी आणि अन्य बाबींवर निरीक्षण नोंदवणार आहे. 

अविनाश पांड्ये अडचणीत येणार 

गेहलोत-पायलट यांच्यातील वादामध्ये राजस्थानचे प्रभारी महासचिव अविनाश पांडे यांच्या अडचणी वाढण्याचीही चिन्हे आहेत. सचिन पायलट यांनी अविनाश पांड्ये यांना पदावरुन हटवण्याची मागणी प्रियांका गांधी आणि अहमद पटेल यांच्यासमोर केल्याचे बोलले जात आहे. अविनाश पांड्ये यांनी गेहलोत यांना एकतर्फी पाठिंबा दिला, असा अरोप सचिन पायलट यांनी केला आहे. त्यामुळे अविनाश पांड्ये यांच्याकडील पदभार जाण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Pilot back Congress after one month intervention by Gandhi family read behind story of Rajasthan crisis