esakal | सचिन पायलट यांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, बंडखोरीचा वारसा पण...
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. सचिन पायलट यांची बंडखोरी ही नवी नाही तर त्यांना वारसाच मिळाला आहे. 

सचिन पायलट यांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, बंडखोरीचा वारसा पण...

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं होतं. मात्र सचिन पायलट यांचं हे बंड आता थंड करण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. सचिन पायलट यांची बंडखोरी ही तर त्यांना वारसा म्हणूनच मिळाली आहे. सचिन पायलट यांचे वडील स्वर्गीय राजेश पायलट हेसुद्धा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांनीही अनेकदा बंडखोरी केली मात्र शेवटपर्यंत काँग्रेसची साथ सोडली नव्हती. राजेश पायलट यांनी म्हटलं होतं की, पक्षात कोणीही उत्तर देणारं कोणी नाही. पारदर्शकता उरली नाही आणि खुर्चीला मुजरा केला जात आहे.  एवढंच नाही तर त्यांनी थेट गांधी कुटुंबियांना आव्हान दिलं होतं. असं असलं तरीही ते कधीच काँग्रेसमधून बाहेर पडले नव्हते.

राजेश पायलट यांनी त्यांचे करिअर हवाई दलात करण्याचा निर्णय घेतला होता. 13 वर्षे हवाई दलात सेवा बजावल्यानतंर त्यांनी राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. गांधी कुटुंबाच्या माध्यमातून ते काँग्रेसमध्ये आले होते. पुढे 1980 ला त्यांनी राजस्थानातील भरतपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. पायलट असल्याने ते संजय गांधींच्या जवळचे होते. मात्र नंतर राजीव गांधींसोबतही त्यांची जवळीक वाढली. पुढे राजेश पायलट यांनी केंद्रातील सत्तेत भूमिका पार पाडली. राजीव गांधींच्या हत्येनंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली त्याच काळात राजेश पायलट यांनी बंडखोरीचे शस्त्र उपसले होते. 

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1997 मध्ये राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. यात त्यांना यश मिळालं नाही. तेव्हा काँग्रेस गांधी कुटुंबाशिवाय इतरांच्या नेतृत्वाखाली आणि डळमळीत झालेली होती. याचवेळी काँग्रेसमध्ये सोनिया गांधींनी प्रवेश केला आणि 1998 ला पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. 1999 मध्ये सोनिया गांधी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी त्या पंतप्रधान होण्याची चर्चा सुरु होती. दरम्यान, पीए संगमा, शरद पवार आणि तारिक अनवर या नेत्यांनी पक्ष सोडला. तेव्हा राजेश पायलट हेसुद्धा पक्ष सोडणार अशी चर्चा होती. मात्र राजेश यांनी काँग्रेसला साथ दिली. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे संबंध मात्र बिघडत गेले. 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी सोनिया गांधींविरुद्धच्या उमेदवाराला साथ दिली होती. 2000 साली सोनिया गांधींच्या विरुद्ध जितेंद्र प्रसाद उभा राहिले होते. त्यात जितेंद्र प्रसाद पराभूत झाले. दरम्यान, त्याआधीच 11 जून 2000 रोजी एका अपघातात राजेश पायलट यांचे निधन झाले. काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतरही त्यांनी शेवटपर्यंत पक्षाची साथ सोडली नव्हती.

हे वाचा - दिल की 'राहत'! 'दो गज जमीं' के 'जमीनदार'

आताही सचिन पायलट यांनी पक्षाच्या विरोधात बंड केल्यानंतरही पक्ष सोडलेला नाही. पायलट यांचे पक्षात काँग्रेस नेत्यांनी स्वागत केलं आहे. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस त्यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले होते. त्या काळात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत केमेंट्स केल्या होत्या. या सगळ्यावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'माझ्यावर माझ्या घरच्यांचे काही संस्कार आहेत. मी कोणाचा कितीही विरोध केला तरी, मी तशी भाषा वापरणार नाही. मी त्यांचा सन्मान करतो. पण, मला कामाविषयीचे मुद्दे उपस्थित करण्याचा अधिकार आहे.'

loading image