उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी
मंगळवार, 14 जुलै 2020

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे.

जयपूर- राजस्थान काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर कारवाईचा प्रस्ताव पारित करण्यात आला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अन्य तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय देखील पक्षाने घेतलाय. या कारवाईनंतर पायलट यांनी एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं", असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सचिन पायलट यांनाच दणका; दोन मंत्र्यांसह पदावरुन हकालपट्टी
सचिन पायलट यांनी ट्विटरवरील आपलं प्रोफाईलही बदललं आहे. त्यांनी आपल्या नावासमोरील काँग्रेस हा शब्द काढून केवळ आमदार असं लिहिलं आहे. तसेच माजी मंत्री असाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे पायलट आता काँग्रेसमधून बाहेर पडल्याचं स्पष्ट होतं आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, पण सत्याला हरवले जाऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे.

सचिन पायलट यांच्या जागी गोविंद सिंह दोतासरा यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर करण्यात आला. 

CBSE बोर्ड दहावी परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी; निकाल जाहीर होणार...
सचिन पायलट यांचं मन वळवण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची प्रयत्न केल्याचं कळत आहे. मात्र, आज झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली. त्यानंतर पक्षाने त्याना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. पायलट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पण, सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पायलट यांचे पुढील मार्गक्रमण कसे असेल याकडे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता सचिन पायलट हेही बाहेर पडल्याने काँग्रेसची पीछेहाट होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Pilots first reaction after being fired from the post of Deputy Chief Minister