
क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या सर्वांचे कालचे ट्विट एकाच पॅटर्नचे आहेत. याच्या मागे अदानी-अंबानी जाहिरातीचा परिणाम असल्याचीही चर्चा सुरू आहे.
क्रिकेटच्या मैदानात देवाची उपमा लाभलेला माणूस, एका ट्विटमुळं चाहत्यांच्या नजरेतून उतरलाय. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बॅटच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची आदर्श तपस्या एका ट्विटने भंग झाली. सचिन थेट शेतकऱ्यांच्या विरोधात बोलला नसला तरी, त्याच्या साजूक बोलण्यामुळं कुणाची बोट तुपात पडली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शतकांचा बादशहा स्वार्थासाठी खेळायचा, असे मानणारा एक वर्ग यापूर्वी होता. कर चुकवेगिरीसाठी त्याने खेळलेला स्वीप शॉटही कुणाला रुचला नव्हता. पण, हे सर्व वैयक्तिक मुद्दे होते. जेव्हा त्याला 'भारतरत्न' मिळाला त्यावेळी असाच काही सूर उमटला होता. पण, रिहाना आणि ग्रेटाला थोपवण्यासाठी त्याने खेळलेला स्ट्रेट ड्राइव्ह टाळ्यांपेक्षा रागच मिळवून गेला.
कुणाला पटो ना पटो सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की, तो बाद झाल्यानंतर देशभरात टीव्ही बंद केला जायचा. ज्याच्या शतकासाठी प्रार्थना केली जायची. 2003 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याच्या पायात गोळे आले होते. तेव्हा अनेक क्रिकेट चाहत्यांच्या पोटात गोळा आल्याचा किस्साही अनेकांना आठवत असेल. तो नर्व्हस नाइंटीजचा शिकार झाल्यावर जी अवस्था त्याला मानणाऱ्यांची व्हायची अगदी तशीच काहीशी अवस्था त्याच्या एका ट्विटमुळे झाली आहे. काहींनी तर त्याच्या आडनावाचा संदर्भा देत तो, थेट 'संघा'साठी बॅटिंग करत असल्याचा टोलाही लगावलाय. सचिनशिवाय इतर काही क्रिकेटर्सनीही #togetherinda मोहिमेच्या रिंगणात बॅटिंग केली. पण, सोशल मीडियावर 'विकेट' पडली ती सचिनची.
कंगनाची रोहितविरोधात बोलंदाजी; ट्विटरने दिला 'नो बॉल'
सचिनशी रिलायन्स ग्रुपशी असणारे संबंध हे देखील त्याला कारणीभूत आहेत. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा संघ हा नीता अंबानी यांच्या मालकीचा. कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनात रिलायन्स ग्रुपही टार्गेट झालाय. विशेष म्हणजे सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे रिलायन्स ग्रुपने एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत कृषी कायद्याशी आपला संबंध नाही हे स्पष्ट केले. रिलायन्सचे हे निवेदन सरकारचे समर्थन करणारे होते. तसेच सचिनचे ट्विट हे अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा युक्तीवाद खोडता न येणारा आहे. काहीजण अंबानींचा पाहुणा होणार असल्यामुळे सचिन त्यांच्याकडून बॅटिंग करतोय, असा सूर उमटतोय. सगेसंबंधी वैगेरे चर्चेच्या खोलात जात नाही. पण, सचिनची भूमिकाही एकतर्फी आहे, यात वाद नाही. यात एकटा सचिन नाही. हे देखील लक्षात घ्यायला हवे.
क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या सर्वांचे कालचे ट्विट एकाच पॅटर्नचे आहेत. याच्या मागे अदानी-अंबानी जाहिरातीचा परिणाम असल्याचीही चर्चा सुरू आहे. जाहिरातीसाठी मनात नसताना अनेकदा मोठ्या कंपन्यांच्या मनासारखं खेळाडूंना वागावं लागतं. याही या कँम्पेनमागचा प्रमुख मुद्दा असू शकतो.
देशासाठी खेळणारा देशासाठी बोलू लागला तर, चूक काय? असाही प्रश्न काहींना पडू शकतो. तो स्वाभाविक आहे. पण, जर बोलायचेच होते तर, दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाच्या काळात तो गप्प का होता? सार्वभौमत्वाची भाषा करणाऱ्या सचिनला शेतकऱ्यांची भावना कळत नाही का? मुंबईत राहून ती कळणेही अशक्यच. दूध कोण देतं या प्रश्नावर दुधवाला, असे उत्तर देणाऱ्यांमध्ये मुंबईकरांना गणले जाते. सर्वच त्यात येत नसले तरी, सचिनही शेवटी मुंबईकरच. त्याला काय कळणार शेतीचं. तोही व्यावसायिक विचार करुनच बॅटिंग करताना दिसते आहे.
स्ट्रेट ड्राइव्ह मारुनही सोशल मीडिया सचिनची 'विकेट'
तुम्हाला आठवत असेल तर.. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 'मंकी गेट' प्रकरण चांगलेच गाजले होते. हरभजन सिंगने सायमंडला मंकी वगैरे..संबोधले असा गाजावाजा झाला. अख्खा ऑस्ट्रेलियाचा संघ एका बाजूने होता. हा सर्व प्रकार घडला. त्यावेळी सचिन मैदानात होता. या प्रकरणाच्या तपासासाठी निवडलेल्या चौकशी कमिटीसमोर ऑस्ट्रेलियाचा अख्खा संघ उभा होता. यावेळी सचिनची साक्ष ग्राह्य मानली गेली आणि हरभजन निर्दोष सुटला. आता तुम्ही म्हणाला, 'या उदाहरणाचा आताच्या प्रकरणाशी संबंध काय?' तर दोन दशकांहून अधिक काळ स्वभावातील तटस्थपणामुळे सचिनच्या भूमिकेला एक वेगळे महत्त्व होते. त्याच्या मताला खूप मान होता. त्याने ट्विटमधून घेतलेला एकांगीपणा त्याला एकांगी ठरवायला पुरेसा ठरताना दिसतोय. हा मुद्दा बाजूला ठेवून सांगायचे तर, सचिनचे बोल मास्टर स्ट्रोक वाटायचे. कदाचित खेळाच्या मुद्यावर त्याला तशीच उपमा देईल. पण, सध्याच्या घडीला सचिनचा स्ट्रोक फुसका म्हणावा लागेल.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात सचिन तेंडुलकरला खासदारकी मिळाली होती. संसदेत तो किती वेळा हजर राहिला? यावरून त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ज्यावेळी त्याने संसदेत भाषणाला सुरुवात केली, त्यावेळी त्याला मतही मांडता आले नाही. नाइलाजास्तव सचिनला आपला मुद्दा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडावा लागला होता. वाटलं होते. या घटनेनंतर आपले राजकीय नेत्याचा स्तर त्याला कळला असेल. पण, सचिनने आज सोशल मीडियावर नकळतपणे त्याला विरोधा करणाऱ्यांना साथ देत शेतकऱ्यांना विरोधात बॅटिंग केली ते न रुचणारे असेच होते.
सचिन रमेश तेंडुलकर त्याच्या बऱ्याचशा भाषणात एक वाक्य सांगत आलाय. चांगला क्रिकेट होण्यापेक्षा एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न कर, अशी वडिलांनी शिकवण दिल्याचे तो अनेक भाषणात उल्लेख करतो. रमेश तेंडुलकर यांच्या प्राजक्त या काव्य संग्रहातील ओळींनीच सचिनला प्रश्न विचारावासा वाटतो,
मग चुकला तो कोण?
यालाही कळते
त्यालाही कळते,
मग छळतो तो कोण?
यालाही पटते
त्यालाही पटते
,
मग पिटतो तो कोण?
यालाही झोंबते
त्यालाही झोंबते,
मग झोंबतो तो कोण?
हाही नाही
तोही नाही,
मग असतात ते कोण?
(ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत. सकाळ माध्यम समूह त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)