NEET Exam: 700 किमी प्रवास केला पण 10 मिनिटं उशीर झाल्यानं वर्ष गेलं वाया

प्रमोद सरवळे
Monday, 14 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये देशभरात रविवारी नीटची ( National Eligibility cum Entrance Test ) परिक्षा घेण्यात आली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेस (नीट) देशभरातील 3 हजार 842 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.

कोलकाता: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी देशभरात रविवारी नीटची ( National Eligibility cum Entrance Test ) परिक्षा घेण्यात आली. बऱ्याच पक्षांनी, संघटनांनी आणि पालकांनी कोरोनाकाळात होत असलेल्या या परिक्षेवर आक्षेप घेतला होता. रविवारी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (NEET) देशभरातील 3 हजार 842 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील जवळपास 90 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.

बारावी नंतरच्या होणाऱ्या या परिक्षेस विद्यार्थी वर्षभर तयारी करत असतात. रविवारी झालेल्या नीट परिक्षेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण बिहार राज्यातील दरभंगा येथील संतोष कुमार यादव या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता आली नाही. संतोष 700 किलोमीटरचं अंतर  24 तासात प्रवास करुन बिहारमधून कोलकातामध्ये आला होता. एक दिवस आणि रात्र प्रवास करून संतोष त्याच्या परीक्षा केंद्रावर पोहचला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संतोषला 10 मिनिटं उशीर झाल्याने त्याला परीक्षेस बसू दिलं नाही. पश्चिम बंगालमधील पूर्व कोलकात्याच्या सॉल्ट लेक सेंटर येथील शाळेत असणाऱ्या परीक्षा केंद्रावर संतोषचा नंबर आला होता. पण इथं उशीर झाल्यानं संतोषला प्रवेश नाकरण्यात आला. अवघा 10 मिनिट उशीर झाला म्हणून संतोषचे संपूर्ण वर्ष वाया गेलं. 

धक्कादायक! पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती,सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते, राज्यांचे मुख्यमंत्री ...यांच्यावर चीनची नजर

या सर्व प्रकाराबद्दल संतोषने स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगितलं की, 'परीक्षा दुपारी दोन वाजता सुरु होणार होती. मी 1 वाजून 40 मिनिटांनी केंद्रावर पोहचलो होतो, मात्र दीड वाजण्याच्याआधी केंद्रावर विद्यार्थ्यांनी हजर रहावे असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मला प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना मी प्रवेश देण्यासंदर्भात विनंती केली. मात्र त्यांनी मला प्रवेश दिला नाही'. परिक्षेला झालेल्या 10 मिनिट उशीरामुळं माझं संपूर्ण वर्ष वाया गेलं अशी खंतही संतोषने व्यक्त केली. करोनामुळे नवीन नियम असल्याने तपासणीसाठी लागणारा वेळेचा विचार करता विद्यार्थ्यांनी पेपरच्या तीन तास आधी परीक्षा केंद्रावर येण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

संतोषने त्याच्या 24 तासांहून अधिक वेळ केलेल्या प्रवासाची माहितीही दिली. शनिवारी सकाळी दरभंगावरुन संतोषने सकाळी आठची पहिली बस पकडली होती.  तिथून तो मिर्झापूरला पोहचलो. त्यानंतर पटण्याला जाण्यासाठी संतोषने दुसरी बस पकडली. मात्र वाहतुककोंडी असल्याने त्याला सहा तास उशीर झाला. त्यानंतर शनिवारी रात्री नऊ वाजता त्याने दुसरी बस पकडली. या बसने संतोष रविवारी दुपारी कोलकात्यामधील सिल्दा स्थानकावर पोहचला होता. नंतर एक वाजून सहा मिनिटांनी उतरल्यानंतर तो टॅक्सीने परीक्षा केंद्रावर आला होता. पण तिथं त्याला 10 मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला. संतोषच्या प्रकरणावर शाळेतील परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र एवढे पैसे आणि वेळ खर्च करुन आल्यानंतरही या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न दिल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh can not get chance to attend NEET due to being ten minutes late