भारत बायोटेकच्या लशीला मंजुरी मिळाल्याने काँग्रेस नेते नाराज; आरोग्यमंत्र्यांना मागितलं स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 January 2021

सरकारने स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली- सरकारने स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारताच्या डीसीजीआयने सीरम इंन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी दिल्यानंतर काँग्रेस नेता शशी थरुर यांनी ट्विट केलं आहे. थरुर यांनी कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरावर प्रश्न उपस्थित करत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. 

शशी थरुर काय म्हणाले?

शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटलंय की, ''कोवॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण अजून पार पडलेले नाही. योग्य माहिती हाती येण्याआधीच लशीच्या वापराला परवानगी देणे धोकादायक ठरु शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. पूर्ण परीक्षण होईपर्यंत कोवॅक्सिनच्या वापराला परवानगी द्यायला नको होती. यादरम्यान भारताने अॅस्ट्राझेनकाच्या लशीसोबत अभियान सुरु करायला हवं होतं.'' 

जयराम रमेश यांनी केलं ट्विट

काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत बायोटेक असून परिक्षणाच्या टप्प्यात आहे. अशावेळी तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण झाले नसताना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करुन कोवॅक्सिन लशीच्या वापराला मंजुरी का दिली? आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यायला हवं, असं जयराम रमेश म्हणाले आहेत. 

दरम्यान, तज्ज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकासोबत मिळून तयार करत असलेल्या कोविशिल्ड आणि स्वदेशी भारत बायोटेक बनवत असलेल्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sashi tharoor and jayram ramesh questions health minister over bharat biotech covaxin