राष्ट्रवादीच्या सोडचिठ्ठीनंतर खासदार उदयनराजे प्रथमच शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 11 February 2021

राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर उदयनराजे प्रथमच शरद पवारांना भेटणार असल्याने या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्व आहे.

सातारा : सातारा-जावळी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीगाठीची चर्चा रंगलेली असतानाच, आज दिल्लीत राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावणारी घटना घडणार आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर उदयनराजे प्रथमच शरद पवारांना भेटणार असल्याने या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्व आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा देत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करुन लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. मात्र, यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर चौफेर टीका करत साताऱ्यात आपला दबदबा कायम राखण्यात ते यशस्वीही झाले. त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही भाजपात प्रवेश करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती, त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला मरगळ पाहायला मिळाल्याचे लोकसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान सिध्द झाले.

एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक

लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर प्रथमच उदयनराजे भोसले आज संध्याकाळी पाच वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून शरद पवार आणि उदयनराजे हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्येही भेट होऊ शकते, परंतु ज्या अर्थी उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार असल्याने या भेटीला विशेष महत्त्व आहे. सध्या उदयनराजे हे सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News MP Udayanraje Bhosale Will Meet MP Sharad Pawar In Delhi