कार्यकाळाबाबत आपण समाधानी; सरन्यायाधीश शरद बोबडे

न्यायधीशपदाचा कार्यकाळ समाधानकारक राहिला. मी माझ्या परीने चांगले काम केले आणि यावर आपण समाधानी आहोत.
Sharad Bobade
Sharad BobadeSakal

नवी दिल्ली - न्यायधीशपदाचा कार्यकाळ समाधानकारक राहिला. मी माझ्या परीने चांगले काम केले आणि यावर आपण समाधानी आहोत. आज मी सुखद आठवणी आणि सदिच्छांसह निवृत्त होत आहे, असे मत मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज मांडले. सरन्यायाधीश बोबडे यांनी आपल्या कार्यकाळात ऐतिहासिक अयोध्या खटल्यासह अनेक मुद्दे निकाली काढले. त्यांनी ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली होती. ते आज निवृत्त झाले.

कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी कोविडच्या स्थितीवरील खटल्यावर त्यांनी सुनावणी केली. ते म्हणाले की, या शेवटच्या सुनावणीचा अनुभव संमिश्र आहे. आपण आनंदाने, सदिच्छाने आणि चांगल्या आठवणीने निवृत्त होत आहोत. न्यायालयातील एकाहून एक सरस युक्तिवाद, वकिलांचे उत्तम सादरीकरण, चांगले वर्तन याच्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत.

ऑनलाइन सुनावणीबाबत बोलताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, अशा प्रकारच्या सुनावणीचा फायदा म्हणजे घरबसल्या आपण महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी करू शकत होतो. ऑनलाइन सुनावणीदरम्यान मला वकिलांनी निसर्गसुंदर पर्वतरांगा, आकर्षक चित्रे आणि अनेकदा तर शस्त्रसंग्रहाचे दर्शन घडवले. आपण समाधानाने पद सोडत आहोत आणि आता न्याय व्यवस्थेची मशाल न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या हातात सोपवत आहे. ते समर्थपणे या व्यवस्थेचे नेतृत्व करतील, याचा विश्‍वास आहे. ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायधीशांचा कार्यकाळ हा किमान तीन वर्षाचा असावा, असे मत मांडले.

Sharad Bobade
रेमडेसिव्हीरसाठीची वणवण थांबणार; उत्पादन दुपट्टीने वाढले

आनंद, सद्‌भावना आणि सुखद आठवणींचा ठेवा घेऊन मी निवृत्त होत आहे.

- शरद बोबडे, मावळते सरन्यायाधीश

महत्त्वाचे निर्णय

  • जवळपास १७ महिन्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निकाल. त्यात बहुप्रतिक्षित राम जन्मभूमी वादाचा समावेश.

  • गोगोई प्रकरणात व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा.

  • आधार नसलेल्या भारतीय नागरिकांना मूलभूत सोयी नाकारता येणार नाहीत, असे ठाम मत.

नागपूरकर बोबडे

  • नागपुरात वकील घराण्यात २४ एप्रिल १९५६ रोजी जन्म.

  • बीए, एलएलबी झाल्यानंतर २९ मार्च २००० ला मुंबई खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

  • १२ एप्रिल २०१३ ला सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती.

  • १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ.

  • तंत्रस्नेही असलेले बोबडे क्रिकेटप्रेमी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com