शेतकऱ्यांना राम राम म्हणा तर गुन्हेगारांचे राम नाम सत्य करा; योगींचे पोलिसांना आदेश

टीम ई सकाळ
Monday, 14 December 2020

गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात आता शेतकरी नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

मेरठ - सध्या शेतकऱ्यांचे दिल्ली हरियाणाच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात आता शेतकरी नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राम राम आणि राम नाम सत्यचे वक्तव्य त्यांनी केले आहे. रविवारी मेरठ इथं झालेल्या रॅलीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, जेव्हा शेतकऱ्यांना भेटाल तेव्हा राम राम म्हणा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांसोबत अन्याय होणार नाही. आम्ही पोलिसांना आदेश दिले आहेत की ज्यावेळी शेतकरी बांधवांची भेट होईल तेव्हा त्यांच्याशी बोलताना राम राम म्हटलं पाहिजे तर बहिणी-मुलींवर अत्याचार करणाऱ्या, सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे राम नाम सत्य झाले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केला. विरोधक म्हणायचे की हे निवडणुकीपुरतं आहे आणि कोरोनाच्या काळात थांबेल. तेव्हा पंतप्रधानांनीच सांगितलं होतं की, मंत्री आणि खासदारांचे वेतन थांबेल पण शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला शेतकरी सन्मान निधी थांबणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. 

देशातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मेरठ इथं झालेल्या रॅलीत योगी म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकतेला आव्हान दिलं जात आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचं काम केलं जात आहे आणि हे कधीच सहन केलं जाणार नाही. कोणताही प्रश्न हा संवादाने सुटेल, संघर्षाने नाही.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याच्या पीकाचा आणि उत्पादनाचा मालकही असतो. त्याला त्याचे पीक कुठं विकायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बाजारात किंवा बाजाराबाहेर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ नये असं पंतप्रधानांनी सांगितल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: say ram ram to farmers cm yogi order police merath rally video viral