
पहिल्या व्यावसायिक ‘जीसॅट-२४’ उपग्रहाचे प्रक्षेपण
बंगळूर : अवकाश सुधारणांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकताना न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने (एनएसआयएल) गुरुवारी ‘मागणी पुरवठ्यावर’ आधारित ‘जीसॅट-२४’ या संवाद उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हा उपग्रह डायरेक्ट-टू- होम या सेवेसाठी ‘टाटा प्ले’ ला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘एनएसआयएल’साठी या उपग्रहाची निर्मिती केली आहे. ‘जीसॅट-२४’ हा ‘२४-कू’ बॅँड संवाद उपग्रह आहे. ‘डायरेक्ट टू होम’ या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या ॲप्लिकेशन्ससाठी या सेवेचा वापर करण्यात येईल. दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गुयानातील कोऊरोऊ येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
‘एनएसआयएल’ ही ‘इस्रो’ ची वाणिज्य शाखा आहे. फ्रेंच कंपनी एरियानास्पेसच्या ‘एरियाने-५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारतासोबतच मलेशियाच्या उपग्रहाचेही प्रक्षेपण करण्यात आले. या यशाबाबत बोलताना ‘इस्रो’चे अध्यक्ष आणि अंतराळ विभागातील सचिव डॉ. एस सोमनाथ म्हणाले की, ‘‘ देशातील ‘डीटीएच’ सेवेसाठीच्या ज्या काही व्यावसायिक गरजा होत्या त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘एनएसआयएल’च्या माध्यमातून हे एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. या उपग्रहाच्या निर्मितीसाठी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.’’
Web Title: Science And Technology Isro Indias Gsat 24 Satellite Launch Tata Play
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..