मंत्रिमंडळात येणार 'महिलाराज'

पीटीआय
शनिवार, 25 मे 2019

- लोकसभेत महिला खासदारांची वाढली संख्या.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते.

येत्या 28 ते 30 तारखेदरम्यान होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत जुन्या व नव्या चेहऱ्यांचा समतोल मोदी-शहा साधतील. राज्यातील नितीन गडकरी, पीयूष गोयल व प्रकाश जावडेकर हे मंत्री कायम राहतील, असे समजते. 

मोदींच्या नेतृत्वात 303 जागा जिंकून इतिहास घडविणाऱ्या भाजपच्या संसदीय पक्षाची पहिली बैठक उद्या (शनिवार) संध्याकाळी पाचला संसदीय कक्षात होणार आहे. यात मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात येईल व भाजप आघाडीच्या संसदीय नेतेपदी त्यांची फेरनिवड करण्याची औपचारिकता पार पाडली जाईल. यासाठी भाजप खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. शिवसेनेसह भाजपच्या सहाही घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वावर आधीच विश्‍वास व्यक्त केला आहे. 
दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाबाबत दिल्लीत चर्चा रंगल्या आहेत. अर्थमंत्री जेटली हे पुन्हा त्या पदावर नसतील हे जवळपास नक्की आहे.

जेटलींची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नाजूक बनल्याची चर्चा आहे. भाजपमधील कालच्या विजय सोहळ्यास व आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसही ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्याबरोबरच सुषमा स्वराज, थावरचंद गेहलोत व नरेंद्र तोमर आदी मंत्र्यांच्याही फेरप्रवेशाबाबत साशंकता आहे. 
भाजप नेतृत्वाचे या पुढचे लक्ष्य पश्‍चिम बंगालमधील ममता सरकार पाडणे हे असल्याने व बंगालमधील सर्वाधिक 17 खासदार निवडून आल्याने या राज्यातील सर्वाधिक, किमान 4 ते 5 खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणे निश्‍चित मानले जाते.

मध्य प्रदेश व कर्नाटकातील सरकारांवरही भाजप नेतृत्वाची नजर असल्याने त्या राज्यांतूनही नवे चेहरे समोर येतील. हरियाना व महाराष्ट्र यांच्या विधानसभा निवडणुका 2019 मध्येच असल्याने त्या राज्यांनाही लक्षणीय प्रतिनिधित्व मिळणार हे नक्की मानले जाते. ही सारी राज्ये सोडून उत्तर प्रदेशातील किती मंत्र्यांना संधी मिळते याबाबतही उत्कंठा आहे. 

गडकरींचे खाते कायम राहणार

हंसराज अहीर यांचा धक्कादायक पराभव झाला तरी महाराष्ट्रातील सध्याचे भाजप मंत्री कायम राहणार हे स्पष्ट आहे. गडकरी व जावडेकर यांची तर तीच मंत्रालये राहतील अशीही चिन्हे दिसतात.

गडकरी आपल्या मंत्रालयातील कामावर समाधानी असून, विवादांपासून दूर राहणाऱ्या जावडेकर यांच्याकडून "नवीन शैक्षणिक धोरण' मार्गी लावण्याची मोदींची इच्छा असल्याचे समजते. घटक पक्षांपैकी रामदास आठवले यांना राज्यातील नेतृत्वाने पुन्हा मंत्रिपदाचा शब्द दिल्याचे समजते. 

शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळाल्यास अनिल देसाई यांच्याबरोबरीने अरविंद सावंत किंवा भावना गवळी यांना संधी शक्‍य आहे. संजय धोत्रे व रक्षा खडसे यांच्यासह काही जणांनाही मंत्रिपदाची संधी मिळणे शक्‍य आहे. 

एनडीएचीही बैठक उद्याच होणार आहे. भाजप संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार मोदींच्या नेतृत्वाखाली आगामी पाच वर्षांत यशस्वी व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी "एनडीए' कार्यरत राहील. हा विजय सुशासन व महिला-नवमतदारांच्या आकांक्षांचा विजय असल्याचेही मंडळाने म्हटले. 

सतराव्या लोकसभेत..... 
300 सदस्य 
प्रथमच निवडून आलेले 

197 
फेरनिवड झालेले 

394 
पदवीधर 

74 
सर्वाधिक महिला खासदार 

27 
मुस्लिम 

27 टक्के 
12 वीपर्यंत शिकलेले 

12 टक्के 
चाळीस वर्षांच्या आतील तरुण खासदार 

6 टक्के 
सत्तरीच्या पुढचे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seats of Woman MP have been Increased in Loksabha