कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शासन-प्रशासन गाफील राहिलं - मोहन भागवत

'हम जितेंगे : पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड' या व्याख्यानमालेदरम्यान ते दिल्लीत बोलत होते.
Mohan Bhagvat
Mohan BhagvatPhoto by ANI

नवी दिल्ली : भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (second wave of corona virus) चांगलंच झोडपून काढलं असून यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अजूनही काही राज्यांमध्ये कोरोनाचं हे थैमान सुरुच आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagawat) यांनी भारताला बसलेल्या कोरोनाच्या या फटक्याबाबत भाष्य केलं आहे. 'हम जितेंगे : पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड' या व्याख्यानमालेदरम्यान ते दिल्लीत बोलत होते. ११ मे पासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. (second corona wave hits India RSS chief Mohan Bhagwat said about it)

भागवत म्हणाले, "आपल्याला संकल्पपूर्वक या आव्हानाशी लढायचं आहे. कोरोनावर संपूर्ण विजय मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. देशात पहिली लाट आल्यानंतर डॉक्टर्स दुसऱ्या लाटेचा इशारा देत होते पण आपण सर्वजण, शासन आणि प्रशासनही गाफील राहिलं. त्यामुळेचं आत्ताचं संकट ओढवलं आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. याच्याशी आपल्याला घाबरायचं नाही तर लढण्याची तयारी करायची आहे. समुद्र मंथनावेळी अमृत प्राप्त होईपर्यंत देवतांनी प्रयत्न केले ते निराश झाले नाहीत. हलाहाल विषालाही ते घाबरले नाहीत."

सर्वांनी मिळून काम करुयात

आपल्याला असं काम करायचंय की, सर्व भेदभाव विसरुन गुणदोष मागे सोडून मिळून काम करायचं आहे. आपल्याला उशीरा जाग आली तरी काही हरकत नाही. सामुहिकतेच्या जोरावर आपण आपली गती वाढवून पुढे निघू शकतो. यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वतः व्यवस्थित रहायचा संकल्प करायचा आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सजग रहायचं आहे. सजग राहुनंच चांगला बचाव होऊ शकतो, असंही मोहन भागवत म्हणाले.

प्रत्येक माहिती पडताळून पाहा!

कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाला शुद्ध आहार घेणं गरजेचं आहे. पण कोणीतरी सांगतंय म्हणून कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका तर त्याची पडताळणी करा. आपला अनुभव आणि त्यामागचा वैज्ञानिक तर्क याची पडताळणी केली पाहिजे. आपल्याकडून कोणतीही चुकीची माहिती समाजात जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. सावधगिरी बाळगत उपचार आणि आहार आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर फिरण्याबाबतही आपण काळजी घ्यायला हवी. रिकामं राहू नका काहीतरी नवी शिका. कुटुंबियांसोबत गप्पागोष्टी करा. मुलांसोबत संवाद साधत राहा, असं आवाहनही यावेळी भागवत यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com