
Lalit Gandhi : 'फिक्की' च्या संचालक मंडळावर ललित गांधी यांची निवड
नवी दिल्ली : देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या (फिक्की) कार्यकारी समिती संचालकपदी ललित गांधी सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले.
या निवडीचा कालावधी तीन वर्षासाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. ललित गांधी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड अँग्री.'चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या ९५ व्या वार्षिक सभेत ही निवडणूक झाली.
'फिक्की'सारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावितात. देशाच्या अर्थविषयक आणि उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या 'फिक्की'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांनाही अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही त्यांनी सांगितले.