पुराच्या नुकसानीचा अंदाज पाठवा - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांनी नुकसानीचा तातडीने अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असे शहा यांनी आवाहन केले.

पणजी - महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांनी नुकसानीचा तातडीने अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असे शहा यांनी आवाहन केले. 

पश्‍चिम विभागीय परिषदेच्या २४ व्या बैठकीचे आज येथे शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र, गुजरात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय प्रमुख आणि दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीचे केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आजच्या बैठकीत गेल्या वर्षी गुजरात येथे झालेल्या २३ व्या बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यात महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचा बृहद्‍ आराखडा, बँकिंग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचे संकलन, मच्छीमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि पोस्को कायद्यातील तरतुदींविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Send estimates of flood damage amit shaha