'सेरेंडिपिटी' कला महोत्सवाची पर्वणी! 

Serendipity
Serendipity

क्‍लासिक म्हणजे अभिजात, हे खरं; पण 'सेरेंडिपिटी' म्हणजे काय? गोव्यात सेरिंडिपिटी कला महोत्सव सुरू झाला, तेव्हा साहजिकच हा प्रश्‍न मला पडला. मराठीतले प्रख्यात लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या "इस्किलार' ह्या दीर्घ कथेत "सेरिपी इस्किहार एली' हे वाक्‍य येते. ती एक संकल्पना आहे. त्यातली "सेरिपी' म्हणजे एक धारदार खंजीर आहे. तो म्हणजे "पाते संपून फक्त धारच उरावी' असं काहीतरी. ती कथा डोक्‍यात भिनलेली असल्यामुळं "सेरेंडिपिटी' म्हणजे तसलंच काहीतरी असावं असं वाटलं. पण नाही. हे वेगळंच प्रकरण आहे.

"सेरेंडिपिटी'चा अर्थ शोधल्यावर, "अनपेक्षितपणे मिळालेला सुखद धक्का' आणि "योगायोगाने भाग्योदय घडवणाऱ्या गोष्टींचा शोध लावण्याची ईश्वरदत्त देणगी" असा अर्थ मिळाला. सन 1754 मध्ये हा शब्द जन्माला आला. हॉरेस वॉलपोल (हा उच्चार मी माझ्या आकलनानुसार केलाय) यानं एका पर्शियन परिकथेच्या संदर्भात आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात हा शब्द उपयोगात आणला आणि तदनंतर तो रूढ झाला. 2004 मध्ये ब्रिटिश अनुवाद संस्थेनं इंग्लिशमध्ये भाषांतरित करायला अवघड असलेल्या दहा शब्दांपैकी एक अशी ह्या शब्दाची नोंद केली. 
गोव्यात एका आठवड्याचा "सेरेंडिपिटी कला महोत्सव' सुरू झाला, तेव्हा त्याचा अर्थ हळूहळू उलगडत गेला. ह्या महोत्सवात विविध कलांचा संगम आहे. देशविदेशातले अनेक कलावंत, समीक्षक आणि जाणकार यांच्या सहभागानं हा महोत्सव फुललेला आहे. भारतातल्या अनेक प्रांतातल्या महत्त्वाच्या कलांचा आविष्कार या महोत्सवात होत आहे. कलांचा एक अनोखा संगमच आहे हा! संगीत, नृत्य, नाट्य, कारागिरी, दृश्‍य-कला, छायाचित्रण, शिल्पकला, खाद्य-पेये इतकेच नव्हे, तर गणित आणि विज्ञानाचाही यात समावेश आहे. 
गोव्यातील आदिलशहाचा राजवाडा हे आजचं एक सांस्कृतिक संचित मानलं जातं. हा राजवाडा म्हणजे आज सेरिंदिपिटी कला महोत्सवाचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. प्रामुख्यानं चित्र- छायाचित्र, दृश्‍यकला यांची अनेक दालनं तिथं सजलेली आहेत. ह्या राजवाड्याशिवाय गोवा मनोरंजन संस्था, कला अकादमी, जुने वैद्यकीय महाविद्यालय, दयानंद बांदोडकर मैदान, गार्सिया द ऑर्ता गार्डन, क्रीडा प्राधिकरण मैदान आणि कांपालमधील एक बंगला या ठिकाणीही हा महोत्सव सुरू आहे. ही एकूण आठ ठिकाणं झाली. गोव्यात पहिल्यांदाच होणारा हा महोत्सव आठ ठिकाणी होतोय, हे नोंदवण्यासारखं वैशिष्ट्य होय! 


आदिलशहाच्या राजवाड्यात होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वाचा म्हणजे, "एक्‍स्च्युअरी टॉक्‍स'. कलेच्या निर्मितीमधील अडचणी कोणत्या? विविध कलांभोवतीची कुंपणं कोणती? ती कशी निर्माण झाली? ती कशी ओलांडता येतील? कलेभोवतीच्या कुंपणांमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? अशा अनेक प्रश्‍नांच्या अनुषंगाने चर्चा झाल्या. कला आणि वर्तमानकालीन जगणं यावरची साधकबाधक चर्चा झाल्यामुळं अनेक संकल्पना स्पष्ट होत गेल्या. सर्व कलांच्या अभिव्यक्तीविषयीच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास ही समग्र चर्चा महत्त्वाची ठरणारी आहे. "ऑल डे कॉन्क्‍लेव्ह' उपक्रमात एका दिवसात पाच सत्रांचं आयोजन केलेलं होतं. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर कलेचा प्रभावी उपयोग करता येईल का? विशेषतः रंगमंच माध्यमाचा उपयोग त्यासाठी कसा करता येईल? यावरची चर्चा उद्‌बोधक होती. कला-विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ आणि ह्या मिलाफाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम यावर प्रदीर्घ चर्चा घेण्यात आली. कलेचा विकास आणि कारागिरीचा विकास अशी सांगोपांग चर्चा करतानाच विविध माध्यमांच्या उपयोगातून समाजमनाची घडण करणं किंवा त्यात बदल घडवणं, त्यात येणारे अडथळे अशा समस्यांचा ऊहापोह विस्तारानं करण्यात आला. मधुश्री दत्ता, अनुराधा कपूर, संयुक्ता साहा, असीम वाकिफ, प्रतीक राजा, अभिषेक हाजरा, लैला तय्यबजी, रितू सेठी, कलाम पतुआ, दीपक शिवरामन इत्यादी प्रतिभावंताचा चर्चेत सहभाग होता. कलेच्या क्षेत्रातल्या आपापल्या अनुभवांची मांडणी करत विचारांना दिशा देण्याचे काम ह्या नामवंतांनी केलं. कलाकारांसाठी कल्पनाशक्ती आणि सातत्यपूर्ण सराव किती महत्त्वाचा आहे याचं विवेचन "ल्युसिड लिप' मध्ये मनोरंजक रीतीनं सादर झालं. उरिल बार्थलेमो, भिसाजी गाडेकर, यास्मिनजहॉं नुपूर यांच्या अदाकारीतून हे उलगडत गेलं. त्याचा अनुभव केवळ विलक्षण असाच म्हणावा लागेल. 


संस्कृती आणि परंपरा या बाबतीत गोमंतभूमी आपलं वेगळं वैशिष्ट्य राखून आहे. गोमंतकीय पोषाखही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेले असतात. अशा दहा गोमंतकीय ऐतिहासिक पेहरावांचा आविष्कार प्रख्यात वेषभूषाकार वेंडेल रॉड्रिग्ज यांनी घडवला. त्यांनी ऐतिहासिक संदर्भ शोधून हे पोषाख तयार केलेले आहेत. गोमंतकाच्या वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यांवर पोषाख कसे होतो याची कल्पना त्यावरून येते. तसेच साड्यांचे विविध प्रकार काळ आणि सामाजिक स्तरानुसार मांडलेले आहेत. त्यातल्या कुणबी साड्या हा एक खास विभाग आहे. 1930 च्या दशकातील वस्त्रालंकार, पानो बाजू वस्त्रविशेष, शांतादुर्गा साड्या, मुसलमानी टोप्या, पगड्या, एडविन पिंटो बूट, झोट्टी सॅंडल हे प्रकार आहेत. सातव्या शतकातील बुद्ध मूर्ती आणि इतर कलाकृतीही त्यात आहेत. फॅशन आणि फाईन आर्ट छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता यांच्या सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लक्षवेधक आहे. 
आधुनिक भारतातील (ब्रिटिश कारकीर्दीतील) सर्वात जुनं संवादाचं, निरोपांच्या देवाणघेवाणीचं साधन म्हणजे पोस्टकार्ड! हा एक आगळावेगळा कार्यक्रम. गोव्यातील तत्कालीन युवा पिढीचं भावविश्व पोस्टकार्ड मांडणीमधून व्यक्त झालं. अलीकडच्या पिढीचा अत्यंत प्रिय कार्यक्रम म्हणजे स्वयंप्रतिमा (सेल्फी), त्यात दीड लाखाहून अधिक लोकांच्या स्वयंप्रतिमा मांडण्यात आल्या. 


आता थोडं सादरीकरण प्रयोगाकडे वळायला हवं. नाट्यक्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या अनुराधा कपूर आणि ललित दुबे यांनी ख्यातनाम नाट्यदिग्दर्शक अभिलाष पिल्लई यांच्या संकल्पनेवर विल्यम शेक्‍सपिअरच्या "द टेम्पेस्ट' ह्या नाटकाचं आधुनिकीकरण सादर केलं. सर्कस हा सादरीकरणाचा लोकप्रिय प्रयोग असतो, पण त्याला सैद्धांतिक अधिष्ठान नसतं. पण, ह्या महोत्सवात सर्कस आणि तत्सम सादरीकरणाला पारंपरिक चौकटीच्या बाहेर काढून रसिकाना वेगळा विचार करायला लावणारा प्रयोग ह्या नाट्यकर्मींनी सादर केला. ह्या नाट्यकृतीचा पहिलाच प्रयोग आहे. सर्कस आज इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना "तालातुम' हा प्रयोग करून तिला नवजीवन देण्याचा हा प्रयत्न आहे. "तालातुम' हा एक अनोखा प्रयोग आहे. कमीत कमी संवादात, जास्तीत जास्त शारीरिक अभिनय, प्रभावी प्रकाशयोजना, साजेशी वेषभूषा यासह कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासह पन्नास लोकांचा समुदाय हे सादरीकरण करतो. रंगभूमीची नवी भाषा म्हणून ह्या प्रयोगाकडे पहावं लागेल. सर्कसला उत्त्तेजन आणि सर्कस कलाकारांना शाश्‍वत उपजीविकेचं साधन मिळावं यासाठीे हा प्रयोग आहे असं सादरकर्त्यांनी सांगितलं. "तालातुम' मध्ये सर्कस, जादू, कठपुतळी, जिप्सी कला, नृत्य, नाट्य, संगीत अशा अनेकविध कलांचा संगम आहे. ह्या प्रयोगात दृश्‍य आणि मौखिक सादरीकरणाचा अनोखा आयाम दिसतो. तसेच हा एक शैक्षणिक उपक्रमही आहे. सर्कस सादरीकरणाचं तीन दिवसाचं अभ्याससत्रही ह्या प्रयोगात समाविष्ट आहे. रसिक आणि कलाकार यांच्यासाठी हा एक अनोखाच प्रयोग आहे! 


श्रावणाचे आगमन, आम्रवृक्षाचा चमेलीच्या वेलीशी विवाह, राधा-श्रीकृष्ण आणि अशा अनेक विषयांवरील नृत्यनाट्य, कथ्थक, भरतनाट्यम्‌, ओडीसी, शास्त्रीय- उपशास्त्रीय गायन, वादन, पारंपरिक आणि आधुनिक वाद्यांचा स्वरमेळ, केवळ शास्त्रीयच नव्हे, तर शैलीदार गायकीतील पॉप संगीत असा विविध कलांचा संगम असलेला हा "सेरिंडिपिटी' कला महोत्सव म्हणजे सर्व कलांच्या रसिकांसाठी एक पर्वणीच आहे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com