दिल्लीतील दंगलप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप; 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'चा अहवाल प्रसिद्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

उत्तर-पूर्व दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीसंदर्भात ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली- उत्तर-पूर्व दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीसंदर्भात ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही मानवी अधिकारांवर काम करणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर सरकारी संघटना आहे. दिल्लीतील दंगलीवर या संघटनेने स्वतंत्र चौकशी अहवाल तयार केला आहे. यात दंगल न रोखणे, त्यात सहभागी होणे, फोनवर मागितलेल्या मदतीला नकार देणे. पीडित लोकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखणे, खास करून मुस्लिम समाजाला मारहाण करणे, असे गंभीर आरोप ‘ॲम्नेस्टी ’ने दिल्ली पोलिसांवर केले आहेत. 

मोदींचा 70 वा जन्मदिवस दणक्यात होणार साजरा; वाढदिवसाची थीमही ठरली

दंगलीनंतरच्या सहा महिन्यांत पीडित व शांततेने आंदोलन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात मारहाण करणे आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्याचा हवाला अहवालात दिला असून त्यावरून मानवाधिकार उल्लंघनाच्या एकाही आरोपावरून आतापर्यंत ‘एफआयआर’ दाखल झालेला नाही. दिल्ली पोलिस दल हे गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते.

हा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी दिल्ली पोलिसांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आठ दिवसांपर्यंत त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही, असा दावा ‘ॲम्नेस्टी’ने केला आहे. त्यांच्याकडून उत्तर मिळाले की अहवालात सुधारणा करणार असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांकडून मिळत असलेल्या संरक्षणामुळे कायदा लागू करणाऱ्या अधिकाऱ्यांना मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यास मुभा आहे आणि त्याबद्दल जबाब देण्यासही ते बांधील नाहीत. म्हणजेच ते त्यांचा कायदा लागू करू शकतात, असा संदेश मिळत असल्याचा आरोप ‘ॲमनेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी केला आहे.

भारताजवळ 2021 च्या सुरुवातीला असणार कोविड-19 लस; किंमतही ठरली 

अहवालासाठी...

- दंगल पीडित ५० नागरिक, साक्षीदार, वकील, डॉक्टर, मानवाधिकार आंदोलक, निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची संवाद साधला.
- दंगलीवर लोकांनी तयार केलेल्या व्हिडिओ चित्रफितींचा अभ्यास.
- १५ डिसेंबर २०१९ रोजी सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा उल्लेख.
- ५ जानेवारी २०२० रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तोडफोड आणि विद्यार्थी व प्राध्यापकांना मारहाणीचा घटनेचा आढावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious allegations against police over Delhi riots Amnesty International report released