Road Accident : भीषण अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर 6 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Accident

Road Accident : भीषण अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर 6 जण जखमी

आसाममधील गुवाहाटीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका रस्ते अपघातात सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गाडीमधून जात असलेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला. आधी कार दुभाजकाला धडकली आणि नंतर दुसऱ्या गाडीला धडक दिली आहे. या गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुवाहाटीतील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर मध्यरात्री हा भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली.

या अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाव्या सत्रला हे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. वसतिगृह क्रमांक २ मधील ही विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर या अपघातात इतर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून देण्यात आलं आहे.