भारत बंदमुळे सातशे रेल्वेगाड्या रद्द

‘अग्निपथ’चा भडका : भीषण वाहतूक कोंडीत दिल्लीकर अडकले
Seven hundred trains canceled due to India shutdown
Seven hundred trains canceled due to India shutdownSakal

नवी दिल्ली - लष्करातील कंत्राटी भरतीच्या ''अग्निपथ योजनेच्या विरोधात काही संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या ''भारत बंद'' ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याचा सर्वाधिक फटका रेल्वेला बसला असून सोमवारी आणखी ७०० पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रद्द केल्याचे रेल्वे व्यवस्थापनाने दुपारी सांगितले. दिल्लीत जंतरमंतरवर आयोजित निदर्शनांत सत्तारूढ आम आदमी पक्षाचे मंत्री व नेते सहभागी झाले, तर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवाजी ब्रिज रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी अडविली.

दरम्यान या भारत बंदचा परिणाम राष्ट्रीय राजधानीत पाहायला मिळत असून दिल्लीच्या नोएडा, गुडगाव सीमांवर प्रचंड रहदारीमुळे सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे आठवड्याच्या सुरवातीलाच दिल्लीकर तासनतास रस्त्यांवरच अडकून पडले. दुपारनंतरही दिल्लीतील वाहतूक पूर्ण सुरळीत झालेली नव्हती.

‘भारत बंद''मुळे दिल्ली पोलिसांनी नोएडा, गुरूग्रामच्या सीमांवर आज सकाळपासून अचानक वाहनांच्या तपासणीला सुरवात केली. त्यामुळे वाहतूक कोंडीची तीव्रता पाहता पाहता वाढली. दिल्ली-नोएडा व दिल्ली-गुरुग्राम या द्रुतगती महामार्गांवरील वाहतूक पूर्ण विस्कळित झाली. नोएडा सीमेवरील वाहतूक कोंडीचे लोण पुढे अशोक नगर, अमरधाम, यमुनेवरील लोकनायक पूल असे करत थेट आयटीओ, मंडी हाऊस व पुढे ल्यूटन्स दिल्लीतील सर्व रस्त्यांवरच पसरले. हजारो वाहने रस्त्यांवर ठिकठिकाणी अडकली. रस्त्यांवर अडकून पडलेल्या वाहनांचा जणू काही पूर आल्याचे दिसत होते. अनेक किलोमीटरपर्यंत ही वाहतूक कोंडी होती. यामुळे अनेकांना कार्यालयांत पोहोचण्यास विलंब झाला.

रेल्वेने सोमवारीही बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या शेकडो रेल्वेगाड्या रद्द केल्या. सकाळी आठ वाजेपर्यंत ही संख्या साडेपाचशएच्या आसपास होती. दुपारी तीन वाजता रेल्वे व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत लघु व लांब पल्ल्याच्या तब्बल ७०९ गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. नवी दिल्ली, आनंद विहार, जुनी दिल्ली व निजामुद्दीनसारखी मोठी स्थानकेच नव्हे तर टिळक ब्रीज, लोधी कॉलनी व सफदरजंगसारख्या कमी वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवरही प्रवाशांचे लोंढे आढळत होते.

देशभर पडसाद

  • किसान मोर्चाचे २४ जून रोजी देशभर आंदोलन

  • हरियानाच्या रोहतकमध्ये युवकांचे तीव्र आंदोलन

  • केरळ, तेलंगण, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये बंदोबस्त

  • बिहारमध्ये कार्यालयांच्या सुरक्षेत वाढ, २० जिल्ह्यांत इंटरनेट बंद

  • पंजाब सरकारची सोशल मीडियावर बारीक नजर

  • उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांकडून दंगेखोरांचा शोध सुरू

  • झारखंडमध्ये आंदोलनामुळे सरकारकडून शाळांना सुट्टी जाहीर

अग्निपथ योजनेची नोटबंदी आणि लॉकडाउनसारखी याचीही घाईमध्ये घोषणा करण्यात आली. याचा कोट्यवधी तरुण आणि कुटुंबांवर परिणाम झाला असून या युवकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे.

- मायावती, अध्यक्ष बसप.

केंद्र सरकारची जबाबदारी ही वर्तमानामध्ये सुधारणा करत भविष्याला आकार देणे ही आहे. भाजपला याच मुद्यावरून सगळ्या बाजूने विरोध होतो आहे.

- अखिलेश यादव, अध्यक्ष समाजवादी पक्ष.

या योजनेच्या माध्यमातून भाजप नवे लष्कर उभारू पाहते आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर हेच अग्निवीर भाजप कार्यालयांसमोर तैनात करण्याचा त्यांचा विचार आहे का?

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com