इंदूरमध्ये आगीत सात मृत्युमुखी; नऊजण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seven killed Indore fire Nine injured

इंदूरमध्ये आगीत सात मृत्युमुखी; नऊजण जखमी

इंदूर : येथील विजयनगर परिसरामध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास एका तीन मजली इमारतीस लागलेल्या भीषण आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य नऊजण हे गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या इमारतीला भीषण आग लागल्यानंतर अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते, त्यांनी आत अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही नागरिकांनी फ्लॅटच्या बाल्कनीमधून बाहेर उड्या मारल्याने तेही गंभीर यात जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे त्यांनी आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. साधारणपणे पहाटे तीन ते चारच्यादरम्यान इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या मीटरबॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग भडकली.

अन् काळाने घाला घातला

मरण पावलेल्यांमध्ये ईश्वरसिंह सिसोदिया आणि नीतू सिसोदिया या पती-पत्नीचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त संपत उपाध्याय यांनी सांगितले. सिसोदिया कुटुंबाने नव्या घराची उभारणी सुरू केली होती त्यामुळे ते काहीकाळ येथे राहायला आले होते पण आज काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची हळहळ नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात आली. मृतामध्ये आकांक्षा उपाध्याय या महिलेचाही समावेश असल्याचे बोलले जाते. या दुर्घटनेमध्ये मरण पावलेले तसेच गंभीर जखमी झालेले हे २५ ते ४५ वर्षे वयोगटातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अग्निशामन दलाचे पथक वेळेवर पोचले असते तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते. अनेकांनी भीतीपोटी इमारतीच्या बाल्कनीमधून उड्या मारल्या.

- अक्षय सोळंकी, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :fireDesh news