भारताच्या कारवाईत पाकचे सात सैनिक ठार; चार जवान हुतात्मा 

पीटीआय
Saturday, 14 November 2020

उरी सेक्टरपासून ते गुरेज सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आणि त्यात चार भारतीय जवानांसह दहा जण मृत्युमुखी पडले.

श्रीनगर - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती वाढलेल्या असताना आज भारतीय जवानाने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले. उरी सेक्टरपासून ते गुरेज सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आणि त्यात चार भारतीय जवानांसह दहा जण मृत्युमुखी पडले. तसेच चार जवानांसह सहा नागरिक जखमी झाले. यावेळी भारताने जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले. पाकिस्तानच्या बाजूने मोठे नुकसान झाले असून अनेक खंदक आणि लॉंचपॅड उध्ववस्त झाले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानने आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दावर, केरान, उरी आणि नौगांव सेक्टरचा या सेक्टरमध्ये बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा जवानात एका कॅप्टनचा समावेश आहे. उरीच्या कमालकोटे सेक्टरमध्ये दोन नागरिक मारले गेले. तर हाजीपीर सेक्टरमध्ये एक महिला मृत्युमुखी पडली. तसेच अन्य ठिकाणी तीन नागरिक ठार झाले. याशिवाय पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक नागरिक जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उरीच्या विविध भागात पाकिस्तानच्या सैनिकांनी सकाळपासून गोळीबार केला. बांदिपोरा जिल्ह्याच्या गुरेज सेक्टरमधील इजमर्ग भागात आणि कुपवाडा जिल्ह्यात केरान सेक्टरमध्ये आघाडीच्या चौक्यांवर आणि नागरी वस्तीवर गोळीबार केला. केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार करत घुसखोरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो लष्कराने हाणून पाडला. केरान सेक्टरमध्ये आघाडीच्या चौक्यांना सीमेवर संशयास्पद हालचाली आढळून आल्या. दहशतवाद्यांना घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारत कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. पूंचच्या सौजियान भागात आज दुपारी दीड ते तीनपर्यंत गोळीबरा सुरू होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीएसएफचे अधिकारी हुतात्मा 
हाजीपीर सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज दुपारी एकच्या सुमारास केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक राकेश दोवाल यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच वासू राजा हे जवान जखमी झाले. त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याचे सूत्राने सांगितले. दोघेही एकाच ठिकाणी तैनात होते. जखमी जवानाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोवाल मूळचे उत्तराखंडचे ऋषिकेश येथील रहिवासी होत. ते २००४ रोजी बीएसएफमध्ये सामील झाले होते. त्यांच्या पश्‍चात वडिल, पत्नी आणि नऊ वर्षाची मुलगी आहे. 

केरान ते उरी सेक्टरमध्ये पाकचा गोळीबार 
केरान सेक्टरमध्ये घुसखारीचा केलेला हा आठवड्यातील दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी माछील सेक्टरमध्ये ७ ते ८ नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांना घुसखोरीचा प्रयत्न केला. तो हाणून पाडताना लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यावेळी तीन जवान हुतात्मा झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Pakistani soldiers killed in Indian operation; Four young martyrs